सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या आनंद मेळाव्यात ३०० वाढदिवस साजरे*


नवी मुंबई : सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ हा नवी मुंबईतील पहिला  संघ असून, सर्वात  क्रियाशील संघ म्हणून ओळखला जातो.  या संघाचे १३००  सभासद असून दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी महिनाभरातले वाढदिवस साजरे केले जातात. पूर्वी  आई-वडिल शाळेत घेऊन गेल्यानंतर शिक्षक मुलांचे शाळेत नाव नोंदविताना  १  जून ही जन्मतारीख लिहित होते. त्यामुळे जून महिन्यात ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद असलेल्या सभासदांचे बहुसंख्येने वाढदिवस  होते.  संघाच्या कार्यालयात  ३० जून २०२५  रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात  ३०९  सभासदांचे  वाढदिवस  संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांच्या अध्यक्षतेखाली साजरे झाले. 


    या आनंद सोहळ्यात संघाच्या नावलौकिकमध्ये भर घालण्याचे काम सातत्याने करीत असल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सेवानिवृत्त  संचालक देवेंद्र भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार व पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,  बुद्धिबळ खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर  १५६ पारितोषिके विजेते  रमेश मोहिते, गायन व नाट्य स्पर्धेतील पारितोषक  विजेते श्री व सौ चंद्रप्रभा चंद्रकांत पारपिल्लेवार, ५० व्या लग्न वाढदिवसाच्या मानकरी कारभारी जाधव, या सर्व मान्यवरांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात  आला. 

 संघाचे अध्यक्ष मारुती कदम यांनी सुरुवातीला सर्वांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आपल्या अध्यक्षीय  भाषणात सांगितले की,  एकत्रितपणे वाढदिवस साजरा करण्यामध्ये खूप आनंद मिळतो. आजकाल घरामध्ये मुलांना आई-वडिलांचे वाढदिवस माहीत नसतात. आईला किंवा  वडिलांना मुलांना सांगावे लागते की,  आज आमचे वाढदिवस आहेत. संघाच्या कार्यालयात मात्र दर महिन्याला संघाचे सभासद असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा गुलाब पुष्प देऊन वाढदिवस साजरे केले जातात. या सभासदांना ७५  वर्षे पूर्ण झाली आहेत,  अशा सभासदांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन संघाच्यावतीने  सत्कार केला जातो.  सर्वांच्या समवेत वाढदिवस साजरे झाल्यामुळे निश्चितच ज्येष्ठ नागरिकांना आनंद होतो. दुसऱ्याला आनंद देण्यात नेहमीच आपल्याला आनंद मिळत असतो.  संघामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून  त्यावर मार्ग काढला जातो.

सुरुवातीला संघाच्या उपाध्यक्ष डॉ. विजया गोसावी यांनी सध्या पंढरपूरच्या वारीचे वातावरण असल्यामुळे विठ्ठलावर आधारित सदस्यांच्या सहकार्याने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरणात चैतन्य निर्माण केले. ज्येष्ठ सदस्य जगदीश एकावडे यांनी  विनोद सांगून चांगलेच हसविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे सचिव राजाराम खैरनार यांनी केले. पंढरपूर वारीची  वेशभूषा घालून आलेले संघाचे उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचा परिचय करून दिला.  सूत्रसंचालन संघाचे सहसचिव शरद पाटील यांनी केले.  तर आभार संघाचे पदाधिकारी बळवंत पाटील यांनी मानले.

 या आनंद मेळाव्याप्रसंगी संघाचे माजी अध्यक्ष नाट्यकर्मी राम काजोलकर यांनी मंगलाष्टक म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली. पावसाचे वातावरण असूनही आनंद मेळाव्यास ज्येष्ठ नागरिक  पुरुष व महिला मोठ्या संख्येने हजर होते.

आपला 

मारुती  विश्वासराव

टिप्पण्या