नांदेड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सिंधूर राबविण्यात आले. यात शेकडो अतिरेकी मारल्या गेले. सीमेवर कोणी छेडखानी केली तर त्याचे काय परिणाम होतात, हे भारतीय सेनेने आणि जनतेने दाखवून दिले. यापुढे सीमेवर आगळीक केल्यास ' गोळी ' चे उत्तर ' गोळ्याने ' दिले जाईल, असा खणखणीत इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी नांदेड येथील सभेतून दिला.
नांदेड येथील नवा मोंढा मैदानावर गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने शंखनाद सभा घेण्यात आली. सभेला संबोधित करताना शाह बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे, भाजपचे प्रभारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण,
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी गुरूगोविंदसिंगजी महाराज यांची पावनभूमी असलेल्या नांदेडला नमन करून देशाचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांची आठवण काढली. अमित शाह म्हणाले की, २३ मे रोजी अतिरेक्यांनी पहलगाम येथे निष्पाप लोकांची हत्या केली. धर्म विचारून त्यांना मारले. पाटणा येथे आयोजित सभेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या घटनेचा निषेध करून हत्या घडविणाऱ्याना शोधून मारू, असा इशारा दिला होता. १० ते ११ वर्षापूर्वी देशात काँग्रेस होती. मात्र आता मोदींच्या नेतृत्वाखाली देश आहे. हे पाकिस्तान विसरले. उरी, पुलवामा घटनेचा आम्ही बदला घेतला. पहलगाम घटनेचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिन्दुर राबविले. यात शेकडो अतिरेकी मारल्या गेले.७ मे रोजी पाकिस्तानातील अतिरेकी अड्डे भारतीय सैन्याने उध्वस्त केले. ८ तारखेला पाकिस्तानने भारतावर द्रोण हल्ले केले मात्र भारतीय डिफेन्स सिस्टिमने त्यांचे द्रोण हवेतच उडविले.९ मे रोजी त्यांच्या हवाई तळावर हल्ले करण्यात आले.आमच्या भूमीचे, माता भगिनींचे सिन्दुर स्वस्त नाही, हेच यानिमित्ताने जगाला दाखवून दिल्याचे अमित शहा यावेळी म्हणाले.
२०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवायचे आहे.त्यासाठी महाराष्टातील जनतेची सहकार्य हवे, असे सांगून अमित शाह म्हणाले की, छत्तीसगडमधील ५ हजार फूट उंचीवरील नक्षलवाद्यांचे अड्डे उध्वस्त करण्यात आले. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातील नक्षलवाद संपून जाईन. पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार भारताने रद्द केला. खून आणि पाणी एकत्र राहू शकत नाहीत, हे पंतप्रधानांनी सांगितले आहे. ऑपरेशन सिन्दुर नंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळ विविध देशात पाठविण्यात आले. हे शिष्टमंडळ कोणाची वरात आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्याने अवहेलना केली. मला समजत नाही, शिवसेना कोणत्या दिशेने जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ह्याचे समर्थन केले असते, असेही अमित शाह यावेळी म्हणाले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा