मुंबई
प्रज्ञा नीळकंठ सामंत लिखित 'कोकणस्थ' या ललितलेखसंग्रहाचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या 'रंगस्वर' या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली, सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी विचारपीठावर माजी आमदार अरविंद नेरकर, डॉ. मुकुंद कुळे, डॉ. श्रीराम गव्हाणे, सुहास ठाकूर, राजेंद्र सामंत इ. मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
लेखिका प्रज्ञा सामंत यांनी आपले वडील नीळकंठ सामंत (माजी आमदार) यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेला वाहन पुरवठा व्यवसाय नेटानं पुढं चालविला आणि तो एका उंचीवर नेला. कोवळ्या वयात पडलेली जबाबदारी यशस्वीपणे कशी पार पाडली. त्यासंबंधीच्या काही आठवणी या पुस्तकात आहेत. यासोबतच कोकणातील निसर्ग, कोकणातील मंदिरे, देवदेवाचार यांचे रंजक लेखही यात आहेत.
कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी आपल्या भाषणात पुस्तकातील सौंदर्यस्थळे अधोरेखित केली. त्या पुढे म्हणाल्या, की प्रज्ञा सामंत यांनी बाईपणाच्या नव्हे, तर माणूसपणाच्या भूमिकेतून लेखन केले आहे. ह्या लेखनात कुठेही कटुता नाही तर निखळ प्रांजळपणा आहे. ह्या लेखनातून प्रज्ञाताईंची उंची आणि मानवतावादी दृष्टिकोन नजरेत भरतो.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सुरेश सावंत म्हणाले, की कोकणस्थ' ह्या पुस्तकात स्थलदर्शनही आहे आणि जीवनदर्शनही आहे. प्रज्ञा सामंत यांची लेखनशैली नर्मविनोदी आणि ह्रदयस्पर्शी आहे. त्यांचे लेखन पीळदार आणि संमोहक आहे. यातील जीवनानुभव अतिशय रोमांचकारी आहेत. ह्या पुस्तकात लेखिकेचे सश्रद्ध, निसर्गप्रेमी, सुसंस्कृत, सौंदर्यासक्त मन आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे. यात कोकणाचे लोभस व्यक्तिमत्त्व उत्कटतेने उतरले आहे. लेखिकेने ह्या पुस्तकात कोकणी लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्शन घडविले आहे. यातील व्यक्तिचित्रे अतिशय ठसठशीत आणि उठावदार आहेत. प्रज्ञा सामंत यांच्या लेखनात भाषेचे सौंदर्य आहे, विचारांची स्पष्टता आहे आणि भावनांची उत्कटता आहे. ह्या लेखनात कोकणची हिरवाई आहे, सागराचा खळाळ आहे, नारळी-पोफळीची उंची आहे आणि शहाळ्याची गोडी आहे. माणसाचे यंत्र बनत चाललेल्या ह्या कालखंडात लेखिकेची संवेदनशीलता फार महत्त्वाची वाटते.
लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे आणि डॉ. श्रीराम गव्हाणे यांनी आपल्या भाषणात 'कोकणस्थ'विषयी लोकसंस्कृतीच्या अंगाने मांडणी केली. माजी आमदार अरविंद नेरकर, सुहास ठाकूर, राजेंद्र सामंत, प्राची सामंत यांचीही समयोचित भाषणे झाली.
मोहम्मद मकसूद इनामदार, युक्ती मीडियाच्या अर्चना सोंडे, प्राची सामंत, दत्तराम गायकर यांच्यासह अनेक मान्यवरांची या वेळी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन शिवाजी आंबुलगेकर यांनी केले. नीलिमा ठाकूर यांनी आभार मानले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा