ठाणे येथील कवयित्री ज्योती कपिले यांची अनुवादक, स्तंभलेखक, संपादक, मुक्त पत्रकार, प्रकाशक, यूट्युबर, ब्लॉगर, बालसाहित्यकार अशी बहुआयामी ओळख आहे. आजवर त्यांची १४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकताच त्यांचा 'मोगरा फुलला' हा ललितलेखसंग्रह प्रकाशित झाला आहे. यात विविध विषयांवरील वाचनीय असे ३१ लेख आहेत. पाऊसपाणी, मैत्री, वृक्षसंगोपन, स्त्रियांचे आर्थिक स्वावलंबन, सुजाण पालकत्व, संस्कार, गुरूचा महिमा, कृतज्ञतामूल्य, दानाचे महत्त्व, मानसिक आरोग्य, स्वप्नांचा अन्वयार्थ, क्रिकेटचे वेड, वाचन-लेखन, पर्यटन अशी विषयांची विविधता ह्या पुस्तकात आहे. काही लेख व्यक्तिपरिचयात्मक आहेत, तर काही आत्मकथनात्मक आहेत. काही लेखांतून आईवडलांच्या आठवणी जागवल्या आहेत. काही लेखांतून उपक्रमशील शाळा आणि रचनात्मक चळवळीचा परिचय करून दिला आहे. ललितरम्य शैलीत उतरलेले, तरीही काही एक विचार देणारे हे लेखन आहे.
'प्रिय सखी' ह्या लेखात नियमित रोजनिशी लेखनाचे महत्त्व सांगितले आहे. 'सकारात्मक पाऊल' ह्या लेखात हळदीकुंकू ह्या परंपरेचे वर्णन करून त्यात कालोचित बदल करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली आहे.
स्त्री कमावती झाली, तरी अजून ती अर्थसाक्षर झालेली नाही. स्त्री कमावती असणे वेगळे आणि तिचे आर्थिक स्वावलंबन वेगळे. 'खूणगाठ' ह्या लेखात लेखिकेने स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाची गरज अधोरेखित केली आहे. ह्याविषयी कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
मार्च म्हणजे परीक्षांचा महिना. मार्चमध्ये संपूर्ण घरादारालाच परीक्षांचे वेध लागतात. काही चिंतातूर पालक अभ्यास करण्यासाठी पाल्यांच्या मागे हात धुऊन लागतात. त्यामुळे विद्यार्थी वैतागून जातात. 'परीक्षा, नक्की कोणाच्या?' ह्या लेखात लेखिकेने अशा 'मार्क्सवादी' पालकांचे मोठ्या खुबीने कान टोचले आहेत. मुले आणि पालक यांच्या नात्यात प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संवाद असला पाहिजे, असे लेखिकेला वाटते.
आपण 'आरोग्य' ह्या शब्दाची व्याप्ती शारीरिक आरोग्यापुरती मर्यादित करून टाकली आहे. माणसाचे मन आजारी पडू शकते, याचा कोणी विचारच करत नाही. 'आरोग्यम् धनसंपदा' ह्या लेखात लेखिकेने त्यापुढे जाऊन वाचकांचे मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याकडे लक्ष वेधले आहे.
अलीकडे ऑनलाईन आर्थिक व्यवहार वाढले आहेत, त्याच प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. 'सावध ऐका पुढल्या हाका' ह्या लेखात लेखिकेने ह्या प्रकारांची माहिती देऊन सावध केले आहे.
जागतिक तापमानवाढीचे चटके आपण सगळेच सहन करत आहोत, पण त्यावर मात करण्यासाठी होणारे उपाय मात्र फारच तोकडे आहेत. 'पसायदान' ह्या लेखात लेखिकेने मोहन धारिया यांची वनराई, गावोगावच्या देवराया आणि जपानमधील मियावाकी ह्या उपक्रमांची माहिती दिली आहे.
रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे अवनींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतनमधील शिष्यांना संदेश दिला होता : 'तुम्हाला कलावंत व्हायचं आहे ना? मग मेघदूत जगायला शिका. मेघदूत होऊन जा'. 'आषाढ म्हटलं की' ह्या लेखात लेखिकेने कालिदासांच्या मेघदूतातील सौंदर्य उलगडून दाखविले आहे.
जो शाळेत शिकवतो किंवा गुरुमंत्र देतो, तोच केवळ गुरू नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भेटणारा, मदत आणि मार्गदर्शन करणारा प्रत्येक जण गुरूच असतो. अशा प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सल्ला दिला आहे.
दरवर्षी ३० जुलै हा दिवस जागतिक मैत्रीदिन म्हणून साजरा केला जातो. मैत्री ही जीवनाला व्यापून उरणारी गोष्ट आहे. त्यामुळे एका दिवशी मैत्रीदिन साजरा करून भागणार नाही. 'भूतां परस्परे जडो' ह्या लेखात लेखिकेने आपल्या आयुष्यात आलेल्या आणि जीवन समृद्ध करून गेलेल्या मैत्रिणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारतीय परंपरेनुसार संक्रांतीला आणि अधिक मासात वाण आणि दान दिले जाते. ते पुण्यप्रद मानले जाते. 'वाण-दान' ह्या लेखात लेखिका लिहिते, वाण आणि दान द्यायचे, तर त्याला एका महिन्यात आणि पापपुण्याच्या संकल्पनेत कशाला बांधून ठेवायचे? तुमच्यात दानत असेल, तर अन्न, धान्य, वस्त्र, पैसा, ज्ञान, रक्त, नेत्र, त्वचा, अवयव आणि देहदान करणे ही काळाची गरज आहे.
जिवंत माणसाला स्वप्न पडतात आणि प्रत्येक जण आपल्या स्वप्नांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. हे सांगत असताना लेखिकेने आपल्या विचारांचा मोर्चा जागेपणी पाहायच्या स्वप्नांकडे वळविला आहे. 'स्वप्नांचा मागोवा' ह्या लेखात लेखिकेने केवळ स्वप्नरंजन न करता मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले आहे.
नवीन वर्षात आपण वेगवेगळे संकल्प करतो आणि हळूहळू ते विसरूनही जातो. 'कृतज्ञता' ह्या लेखात लेखिकेने कृतज्ञतामूल्य अंगी बाणविण्याची जाणीव करून दिली आहे.
सिनेमा हा लेखिकेचा वीक पॉईंट आहे. 'फर्स्ट डे फर्स्ट शो' ह्या परंपरेच्या त्या पाईक आहेत. हा वारसा आपल्याला आपल्या आजोबांकडून मिळाल्याचे त्या सांगतात. या संदर्भात त्यांनी सांगितलेले सगळेच किस्से वाचनीय आहेत. लेखिकेची कलाभिरुची ताजी, टवटवीत आणि प्रसन्न असल्याचा प्रत्यय येतो.
'मानवतेची मुक्ती' ह्या लेखात लेखिकेने स्त्रीपुरुष समानतेचा आग्रह धरला आहे. मुलींवर शिस्तीचे संस्कार करण्यापेक्षा मुलांवर ते करण्याची अधिक गरज आहे, असे त्यांना वाटते. मुलांच्या अंगी मुलींचे गुण बाणविण्याची आवश्यकता त्या प्रतिपादन करतात.
हल्ली फेसबुक, व्हाट्सऐप, इन्स्टाग्राम हे परवलीचे शब्द बनले आहेत. ह्या समाजमाध्यमांत माणूस पुरता रुतून बसला आहे. याचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. लेखिकेने 'लेखाजोखा भिंतीचा' ह्या लेखात आभासी जगातून बाहेर पडून वास्तविक जगात जगण्याचे, थेट संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.
'मोगरा फुलला' हा ह्या संग्रहातील एक अप्रतिम ललित निबंध आहे. ह्या निबंधात संत ज्ञानेश्वरांच्या ओवीपासून इलाही जमादार यांच्या गझलेपर्यंत आणि शंकर वैद्य यांच्या कवितेपासून थिंक महाराष्ट्र ह्या वेब पोर्टलपर्यंत अनेक संदर्भ आले आहेत. निबंधाच्या शब्दाशब्दांतून मोग-याचा परिमल दरवळत राहतो.
ह्या संग्रहात व्यक्तिपरिचयात्मक असे तीन लेख आहेत. यात त्यांनी महात्मा गांधी सेवा मंदिर ट्रस्टचे बापूसाहेब देशपांडे, हिंदीतील लेखिका डॉ. सूर्यबाला, मुद्रणमहर्षी आनंद लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेतला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील भीमाबाई जोंधळे यांचं 'पुस्तकांचं हॉटेल' आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेगाव येथील 'कवितेचं घर' ह्या दोन रचनात्मक चळवळींविषयी लेखिकेने स्वागतशीलतेने लिहिले आहे.
'उदंड लेकरं येऊ दे' ह्या लेखात महिला मंडळ बालविकास केंद्र ह्या उपक्रमशील शाळेचे कौतुक केले आहे.
ज्योती कपिले यांच्या ललितलेखनात साधेपणा आहे, सहजता आहे आणि सुंदर सूत्रबद्धताही आहे. माणसांच्या खालोखाल लेखिकेचे निसर्गावर प्रेम आहे. ह्या लेखनात जसा भावूकपणा आहे, तसाच कठोर वास्तववादही आहे. लेखिकेच्या भावविश्वाची जडणघडण करण्यात माणसे, निसर्ग, चित्रपट आणि वाङ्मयीन संस्कारांचाही फार महत्त्वाचा वाटा आहे. लेखिका आपल्या ललित निबंधांमधून ढोबळ स्थित्यंतराचा आणि विसंवादाचा वेध घेते. हा वेधही अत्यंत संवेदनशील आणि समंजस असतो. काव्यमय लिहिण्याच्या नादात लेखिकेला उगीचच गूढगुंजनात्मक कल्पनेच्या अचाट भरा-या मारण्याचा मोह पडत नाही. मानवी जीवनविषयक काही वेगळे तत्त्वज्ञान आपण सांगतो आहोत, असा कधी आवही त्या आणत नाहीत. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातील अवतरणे देतात. ज्योती कपिले यांच्या लेखनाची व भावप्रकटीकरणाची सहजता मनाला भिडणारी आहे.
उत्कट जीवनप्रेम, रसिकता, मनःपूर्वकता, मानव आणि निसर्गाविषयीचे तीव्र कुतूहल, मनुष्य स्वभावाचे कंगोरे न्याहाळण्याची आवड आणि स्वतःला आलेले सूक्ष्मातिसूक्ष्म अनुभवही इतरांपर्यंत पोहोचविण्याची उत्सुकता ह्या ज्योती कपिले यांच्या ललितलेखनामागील प्रमुख प्रेरणा आहेत. आत्मनिष्ठा हा ह्या ललितलेखनाचा प्राण आहे. ह्या लेखनाला समृद्ध अनुभवाची डूब आहे. ह्या लेखनात कुठेही आग्रह नाही, दुराग्रह नाही. अभिनिवेश नाही, अट्टाहास तर नाहीच नाही. ह्या लेखनाला दीर्घ चिंतनाचे सखोल परिमाण लाभले आहे. ह्या लेखनात भावकोमल, संवेदनाक्षम नि हळव्या अंतःकरणातील स्पंदने ऐकायला मिळतात. ज्योती कपिले यांचे किस्सेप्रचुर ललितलेख अंतर्मुख बनवून विचार करायला प्रवृत्त करतात. जीवनाकडे आस्थेने पाहण्याची डोळस दृष्टी देतात. जीवनाविषयीचा एखादा अनमोल संदेश देतात. चिंतनशीलता, सघन आशयगर्भता आणि पारदर्शी शब्दकळा यामुळे ज्योती कपिले यांचे ललितलेखन एखाद्या नितळ स्वच्छ तळ्यासारखे शांत आणि लोभस झाले आहे.
'मोगरा फुलला' (ललितलेखसंग्रह)
लेखिका : ज्योती कपिले
प्रकाशक : जे. के. मीडिया, ठाणे (प.)
मुखपृष्ठ : निरंजना शहा
पृष्ठे १५६ किंमत रु. २५०
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा