नांदेड:(दि.१२ फेब्रुवारी २०२५)
प्राचीन संस्कृतीमधील उदात्त तत्त्वांचे जतन करून आधुनिकता व प्रगतीकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. उत्कृष्ट भविष्याची निर्मिती करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाकडे सकारात्मक दृष्टीने बघावयास हवे; याकरता नवीन कोर्सेस सुरू करणे गरजेचे आहे. सकारात्मक वातावरणाची निर्मिती असेल आणि ज्ञान हे सदैव अपडेटेड आणि अपग्रेडेड असले तरच समाजाला त्याचा उपयोग होतो, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खा.श्री. अशोकराव चव्हाण यांनी केले.
प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान पीएम:उषा योजनेअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी विभागाद्वारे आयोजित बहुविद्याशाखीय दोन दिवसीय 'भारतीय ज्ञान प्रणाली: वैश्विक परिप्रेक्ष' या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटकीय सोहळ्यात दि.१० फेब्रुवारी रोजी ते बोलत होते.
याप्रसंगी विचारमंचावर माजी शिक्षण राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. नरेंद्र चव्हाण, संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर, बीजभाषक विदेशी भाषा विद्यापीठ, चीन येथील डॉ. विवेक मनी त्रिपाठी, महात्मा गांधी संस्थान, मॉरीशस येथील डॉ.तनुजा पदारथ बिहारी, केलानिया विद्यापीठ, श्रीलंका येथील डॉ. अनुषा नीलमिनी सलवतुर, माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात श्री.डी.पी. सावंत म्हणाले की, हिंदी राष्ट्रभाषा ही संपूर्ण देशाला जोडणारी भाषा आहे. भारतीय ज्ञान परंपरा ही आधुनिक ज्ञानाशी कशी जोडता येईल, यावर लक्ष केंद्रित करावे. आयुर्वेद आणि योगाभ्यास या भारतातील प्राचीन पद्धतीकडे संपूर्ण जग आकर्षिले गेले आहे. आधुनिक मानवाला आध्यात्मिक आणि मानसिक स्वास्थ लाभणे आवश्यक आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असावयास हवा; हे आपण विसरता कामा नये.
श्री.नरेंद्र चव्हाण यांनी, प्राचीन काळातील चांगल्या बाबी आज निश्चित स्वीकारल्या पाहिजे; मात्र वाईट गोष्टींचा त्याग देखील केला पाहिजे. प्राचीन आणि आधुनिक ज्ञान प्रणाली याचा सुरेख संगम असावयास हवा. प्राचीन काळातील हम्पी आणि मध्ययुगातील ताजमहल हे आजही दिमाखाने आपले वैभव प्रगट करतात.त्याची निर्मिती कशी झाली, हे नवीन पिढीला शिकविले पाहिजे.
आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे म्हणाले की, भारताने शून्याचा शोध लावून विज्ञान व गणितीय क्षेत्रात क्रांती केली. खगोलशास्त्राचे मूळ भारतीय ज्ञान परंपरा आणि संस्कृतीत आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाद्वारे नवविचाराची निर्मिती करण्याचा मानस असून या परिषदेत तीन देश आणि भारतातील विविध घटक राज्यातील १८० प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
सोहळ्याचा प्रारंभ आधुनिक भगीरथ श्रद्धेय कै.डॉ.शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. यावेळी शोधनिबंध संग्रहित ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीत कु.कोमल चव्हाण यांनी सादर केले. प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख डॉ.संदीप पाईकराव यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रियंका सिसोदिया यांनी केले तर आभार डॉ.साईनाथ शाहू यांनी मानले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, संदीप पाटील, अभय थेटे, कालिदास बिरादार, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले. या परिषदेत प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

addComments
टिप्पणी पोस्ट करा