*विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे- गोपाळ मंत्री*

         


      *गंगाखेड (प्रतिनिधी)* विद्यार्थ्यांनी  गैर मार्गाचा अवलंब न करता  अभ्यास करून  पूर्ण आत्मविश्वासाने येणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे व त्यात उज्वल यश प्राप्त करून स्वतःचे, विद्यालयाचे व पालकांचे नाव मोठे करावे  असे प्रतिपादन सरस्वती विद्यालयाचे परीक्षा विभाग प्रमुख तथा निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष गोपाळ मंत्री यांनी केले.शहरातील योगेश्वर कॉलनी येथील सरस्वती  विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024 -25 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम  दिनांक 12 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या शंभर कलमी कार्यक्रमामध्ये कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान यावर्षी व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहे, त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात  येणाऱ्या परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे व उज्वल यश संपादन करावे. शहरातील अग्रगण्य व नामांकित  सरस्वती विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक लक्ष्मण मादरपल्ले, पर्यवेक्षक रमेश गिराम  उपस्थित होते. कार्यक्रमात दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालय, विद्यालयातील शिक्षक, येथे मिळणारे दर्जेदार शिक्षण याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.  तर शिक्षकांमध्ये अनंत काळे, परमेश्वर कातकडे,चंद्रकांत अलापुरे, बालासाहेब सातपुते, शिवप्रसाद मठपती, राजेश लोंढे, स्वप्नील पाटील आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववी च्या विद्यार्थिनी अनुजा धुळगुंडे, सारिका धापसे, मयुरी फड यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व  दहावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या