ग्रामीण साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे हे मराठवाड्याच्या मातीचे वैभव होते. त्यांनी 'आमदार सौभाग्यवती' सारखे अजरामर नाटक लिहून नाट्यक्षेत्रातही आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. केवळ मनोरंजन करणे हा त्यांच्या नाट्यलेखनाचा उद्देश नव्हता, तर प्रबोधन हाच त्यांच्या नाट्यलेखनाचा प्रमुख उद्देश होता. गुरुजींनी आपल्या कथा कादंबर्यांतून मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी कुटुंबांच्या जीवनाचे तलस्पर्शी चित्रण केले आहे. बोराडे सरांच्या एकंदरीत सर्वच लेखनातून ग्रामजीवनातील बदलत्या प्रश्नांची आणि स्थितिगतीची नीट ओळख होते. बोराडे गुरुजींचे साहित्य म्हणजे ग्रामीण स्थित्यंतराचा कलात्मक दस्तऐवज आहे.
दमनयंत्रणेची शिकार झालेली स्त्रीपात्रे हा बोराडे सरांच्या लेखनाचा ठळक विशेष होता. बोराडे गुरुजी हे नवोदितांचा आधारवड होते. त्यांनी अनेक नवोदित लेखक, कवींना सहकार्य आणि मार्गदर्शन केले आहे.
प्राचार्य रा. रं. बोराडे सरांनी कथाकार, कादंबरीकार आणि नाट्यलेखक म्हणून मराठी साहित्यविश्वात आपला अमीट ठसा उमटवला आहे. ग्रामीण जीवनातील बहुविध अनुभव त्यांच्या गाठीशी होते त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्र्य, दैन्य, अज्ञान, हेवेदावे, संकेत, अंधश्रध्दा, परिस्थितीशरणता, लाचारी आणि माणसांचे विविध मनोव्यापार टिपत असतानाच बोराडे सरांनी मराठवाडी माणूस हुबेहुब उभा केला आहे. विविध पात्रांच्या माध्यमातून त्यांनी अफाट व्यक्तिदर्शन आणि जीवनदर्शन घडविले आहे. त्यांनी समूहमनाचे अंतरंग उलगडून दाखविले आहे. मराठवाड्याच्या मातीत जन्मलेला निर्विष विनोद बोराडे गुरुजींनी आपल्या कथेत आणला. गुरुजींच्या जाण्याने मराठवाड्याचा साहित्यशिवार पोरका झाला आहे.
प्राचार्य रा. रं. बोराडे सरांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालसाहित्य इ. वाङ्मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांनी आपल्या कथा कादंबर्यांतून मराठवाड्याच्या समाजजीवनाचे प्रत्ययकारी, वास्तवदर्शी आणि अस्सल चित्रण मराठवाड्याच्या बोलीभाषेतच केले आहे. कष्टकरी माणसांच्या जीवनजाणिवा असीम सहानुभूतीने मांडत असतानाच त्यांनी अशा माणसांचे अज्ञान, विसंगती, अशिक्षितपणा, पारंपरिकता यातून स्थलकालपरत्वे विनोदनिर्मितीही केली आहे. सरांनी आपल्या अनुभवविश्वाच्या बळावर विपुल कथालेखन करून ग्रामीण मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. त्यांची 'पाचोळा' ही कादंबरी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली आहे. बोराडे गुरुजी हे मराठवाड्यातील अतिशय महत्त्वाचे अक्षरयात्रिक होते.
प्राचार्य रा. रं. बोराडे हे मराठवाड्याच्या मातीतून समर्थपणे उदयाला आलेले बी. रघुनाथानंतरचे यशस्वी कथाकार आणि कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या साहित्यातून मराठवाड्याच्या
मातीची आणि मनांची भावस्पंदने हळुवारपणे टिपली आहेत. त्यांनी आपल्या कथांमधून खेड्यापाड्यांतील बहुजन समाजातील शेतकरी आणि शेतमजुरांचे जगणे, त्यांचे नातेसंबंध, या नातेसंबंधांतून निर्माण झालेले भावबंध, ताणतणाव, त्यांचे दैन्य, दारिद्र्य, दु:ख इ. चे जिवंत चित्रण केले आहे. 'नातीगोती' हा बोराडे सरांच्या चिंतनाचा, ध्यासाचा तसेच आवडीचा अनुभवविषय होता. ती सगळी नातीगोती सोडून बोराडे गुरुजी अनंताच्या प्रवासाला निघाले आहेत.
बोराडे गुरुजींना भावपूर्ण आदरांजली!
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

addComments
टिप्पणी पोस्ट करा