नवी मुंबई सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानामधील ७:५० गार्डन ग्रुपमधील ५० पुरुष महिला सदस्यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व सदगुरु श्री. वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त कर्जत येथील निसर्गरम्य वातावरणात ११ एकरवर असणाऱ्या जीवनविद्या ज्ञानपीठाला भेट दिली.. येथील ज्ञानपीठाचे व्यवस्थापक राजेश किशोर पोवळे यांनी सर्वांचे स्वागत करून पोह्यांचा रुचकर नाष्टा दिला. त्यानंतर राजेश पोवळे यांनी या परिसरातील सुख, आनंद, समाधान, तृप्ती, सदगुरु निवास, विश्वशांती प्रार्थना हॉल याबाबत सविस्तर माहिती देऊन सांगितले की, सदगुरु श्री. वामनराव पै यांनी आपणास एक चांगला मंत्र दिला आहे की " तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार " हे खरे आहे. कारण नशीब हे आपोआप निर्माण होत नसते, तर माणूसच केवळ स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. आपण ज्याप्रमाणे करू त्याप्रमाणे नशीब घडेल. मानवी शरीर हे एक विलक्षण कॉम्प्युटर असून, तुम्ही त्याला " विचार _ उच्चार _ आचार " यांच्या द्वारे शुभ किंवा अशुभ फीडिंग कराल, त्याप्रमाणे तुम्हाला सुखदुःखाचे रिझल्ट्स मिळतील. दुसऱ्याला देण्यात नेहमी सुख असते. जगण्यासाठी पैसा हवाच, पण सुखी जीवन जगण्यासाठी पुण्य हवे. विचार बदला, नशीब बदलेल. मनस्थिती बदला, परिस्थिती बदलेल. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुखदुःख तुमच्याकडे परत येईल हा निसर्गाचा अटळ नियम आहे.
जीवनविद्या ज्ञानपीठाचे व्याख्याते अशोक खवळे यांनी आपल्या जीवनातील उदाहरण देऊन मी सदगुरु वामनराव पै यांच्या विचाराने भारावून गेलो आणि माझे जीवन बदलले. वामनराव पैंच्या विचारानुसार जात धर्म पाळला जात नसून, पुरुष व महिला समसमान असून मानव हीच खरी जात आहे. लहान मुलांवर बाल संस्कार होणे गरजेचे आहे. योग्य वयातच मुलं चांगली घडत असतात. त्यांना चांगली संगत मिळते. सदगुरु वामनराव पै यांच्या विचारामुळे समाजात अनेक बदल दिसून येतात. त्यासाठी ही संस्था सतत कार्यरत आहे. आपण सर्वांनी या अमृत ज्ञानाचा फायदा घेऊन इतरांनाही द्यावा. सानपाडा येथील कार्यसम्राट नगरसेवक सोमनाथ वासकर यांनी जीवनविद्या ज्ञानपिठाच्या या सत्कार्याला शुभेच्छा देऊन, यापुढे आम्ही जास्तीत जास्त पुरुष व महिलांना या ठिकाणी घेऊन येऊ, असे आश्वासन दिले. याप्रसंगी ज्ञानपीठाच्यावतीने साधक पिराजी पाटील यांनी सुचविल्यानुसार व्याख्याते अशोक ढवळे यांच्या हस्ते सर्वश्री. सोमनाथ वास्कर, कोमलताई वास्कर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, खजिनदार रणवीर पाटील व सचिव दत्तात्रय कुरळे या मान्यवरांचा सदगुरू वामनराव पै यांचे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. दुपारी सर्वांनी रुचकर अशा सात्विक जेवणाचा आस्वाद घेतला. हलक्या पावलाने आलेले सानपाडा वासीय येथील मौलिक विचारांचा प्रसाद घेऊन जड पावलाने बाहेर पडले. सानपाडा येथील ७:५० गार्डन ग्रुपचा अविस्मरणीय असा एक दिवसाचा कायम आठवणीत राहणारा प्रवास झाला.
आपला
मारुती विश्वासराव

addComments
टिप्पणी पोस्ट करा