बरबडा (जि. नांदेड)
वास्तविक सत्तेत राहूनही उत्तम समाजबांधणी करता येते, पण हल्ली काही लोक आपल्या स्वार्थासाठी समाजा-समाजात विष कालविण्याचे प्रयत्न करत आहेत. समाजाचे जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करणे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन प्रा. डॉ. सौ. मथुताई सावंत यांनी केले.
स्वातंत्र्यसेनानी गोविंदरावजी धर्माधिकारी बरबडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बरबडा येथे आयोजित सातव्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या.
संमेलनाचे उद्घाटन सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली. ग्रंथदिंडीत संमेलन अध्यक्षा डॉ. सौ. मथुताई सावंत, डॉ. सुरेश सावंत, जगदीश कदम, नारायण शिंदे, राजेंद्र गहाळ, रामभाऊ शेवडीकर, प्राचार्य चंद्रकांत पोतदार, मनोज बोरगावकर इ. मान्यवर सहभागी झाले होते. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संमेलनाध्यक्षा डॉ. मथुताई सावंत यांच्या हस्ते झाले.
यावेळी विचारपीठावर संमेलन अध्यक्षा प्रा. डॉ. सौ. मथुताई सावंत, उद्घाटक ना. बाबासाहेब पाटील, शिवराज पाटील होटाळकर, प्रवीण पाटील चिखलीकर, वसंत सुगावे, छायाताई धर्माधिकारी, व्ही. टी. सुरेवाड, दिलीपराव धर्माधिकारी, कार्याध्यक्ष सदाशिवराव धर्माधिकारी, शिवाजीराव धर्माधिकारी, जगदीशराव धर्माधिकारी, इरन्ना कंडापल्ले, सरपंच माधवराव कोलगाने, ज्योतीताई धर्माधिकारी, विजयालक्ष्मी धर्माधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात झाली. संयोजन समितीच्या वतीने विचारपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक भाषणात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे हित जपत असल्याचे सांगितले.
प्रवीण पाटील चिखलीकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणारे बरबड्यासारखे ग्रामीण साहित्य संमेलन नवीन पिढीला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
शिवराज पाटील होटाळकर यांनी, गावागावातील राजकारण कमी करून अशी संमेलने घेतली, तर गाव प्रगतिपथावर जाईल, असा आशावाद व्यक्त केला.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उद्घाटनपर भाषणात म्हणाले की बरबड्यासारख्या गावात सातत्याने साहित्य संमेलने होतात, ही फारच चांगली गोष्ट आहे. यातूनच चांगले विद्यार्थी घडतात. यातून समन्वय आणि विचारांची देवाणघेवाण होईल. आज मुलांपेक्षा मुली सरस होत आहेत. मुलींनी डॉ. सौ. मथुताई सावंत यांच्यासारख्या ग्रामीण लेखिकेचा आदर्श घेऊन आणि सकारात्मकता ठेवून पुढे गेले पाहिजे.
शिक्षकांनी अंत:करणपूर्वक शिकवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. सौ. सावंत पुढे म्हणाल्या, की समाजातील दुष्कृत्यांवर वार करण्यासाठी जहाल विचारांची पेरणी करणारे आणि इतिहास घडविणारे शब्दप्रभू आमच्यातून निर्माण व्हायला हवेत. अशा साहित्य संमेलनांच्या आयोजनामागील हेतूच मुळी हा असतो. किंबहुना साहित्य संमेलन म्हणजे अतिशय सभ्यपणे आणि विचारपूर्वक चालविलेले वैचारिक आणि सामाजिक आंदोलन असते, असे मी मानते. इथे उपस्थित आपण सगळे त्या आंदोलनाचाच एक भाग आहोत, असे भावनिक आवाहन डॉ. सौ. मथुताई सावंत यांनी केले.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सौ. राजेश्वरी कदम यांनी केले. प्राचार्य सुदर्शनराव धर्माधिकारी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
दुसऱ्या सत्रात सुचिता खल्लाळ यांची मुलाखत प्रा. व्यंकटी पावडे आणि प्रा. व्यंकटेश सोळंके यांनी घेतली. मुलाखतकारांनी साहित्यनिर्मिती आणि समकालीन परिस्थितीवर प्रश्न विचारून मुलाखत रंजक केली. विविध प्रश्नांना उत्तरे देताना सुचिता खल्लाळ म्हणाल्या की विद्यार्थ्यांनी आधुनिक काळात माध्यमांचा गरजेपुरता वापर करून स्वतःला घडवले पाहिजे. अनेक संकटे पार करत आपले ध्येय गाठले पाहिजे, असा संदेश दिला. शेतीसमस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादनप्रक्रिया याबद्दल सविस्तर उत्तरे दिली.
या सत्राचे सूत्रसंचालन प्रा. टी. जे. तगडपल्लेवार यांनी केले, तर आभार अक्कमवाड यांनी मांडले.
बालिका बरगळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात उषाताई ठाकूर, रुपाली वागरे, अनिता जाधव, रुचिरा बेटकर, अलका मुगटकर, रोहिणी पांडे, अंजली कांनिंदे, ज्योती करवंदे यांनी कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन संतोष पचलिंग यांनी केले, तर आभार शिंगनवाड यांनी मानले.
श्रोत्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे ग्रामीण साहित्य संमेलन सर्वार्थाने यशस्वी झाले.


COMMENTS