*बंदर व गोदी कामगारांना भरघोस पगारवाढीचा करार संपन्न*


भारतातील प्रमुख बंदरामधील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा भरघोस पगारवाढीचा  वेतन करार २७  सप्टेंबर २०२४  रोजी मुंबईत संपन्न झाला.  इंडियन पोर्ट असोसिएशन व सहा मान्यताप्राप्त कामगार महासंघ यांच्यामध्ये २७  ऑगस्ट २०२४  रोजी दिल्लीमध्ये समझोता वेतन करार संपन्न झाला होता.इंडियन पोर्ट असोसिएशनचे व्यवस्थापकीय संचालक विकास नरवाल यांनी २७  सप्टेंबर २०२४ रोजी द्विपक्षीय वेतन समितीची मिटिंग बोलवली होती. या मिटींगला सर्व बंदरांचे चेअरमन व सहा फेडरेशनचे कामगार नेते यांना अंतिम वेतन करारासाठी मुंबईत निमंत्रित केले होते. दिल्लीत झालेल्या समझोता वेतन करारानुसार  मुंबईत द्विपक्षीय वेतन समितीचे अध्यक्ष श्री. राजीव जलोटा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मिटिंगमध्ये प्रदीर्घ चर्चेनंतर बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२  ते ३१ डिसेंबर २०२६ असा ५  वर्षाचा भरघोस पगारवाढीचा वेतन करार संपन्न झाला.

या वेतन करारानुसार ३१ डिसेंबर २०२१ च्या मूळ पगारात १ जानेवारी २०२२ चा ३०%  महागाई भत्ता विलीन करून त्यावर ८.५० टक्के फिटमेंट दिले जाणार आहे. घरभाडे भत्ता  ३० टक्के मिळेल. नोकरीत असलेल्या कामगारांना प्रति महिना ५००/ रुपये विशेष भत्ता मिळेल.  वार्षिक पगारवाढ ३ टक्के मिळेल. १ जानेवारी २०२२ पासून सध्याच्या प्रथेनुसार  प्रभावी वेतनश्रेणी तयार केल्या जातील. या वेतन करारानुसार पोर्ट  वसाहतीमध्ये राहणाऱ्या कामगारांना कमीत कमी २८३०/ रूपये व जास्तीत जास्त १३५९०/ रूपये तर वसाहतीत  न राहणाऱ्या कामगारांना कमीत कमी ५४१०/ रूपये व जास्तीत जास्त २५५००/ रुपये अशी भरघोस पगारवाढ मिळेल. निवृत्त झालेल्या कामगारांच्या निवृत्ती वेतनात ०१/०१/२०२२ पासून कमीत कमी ११६५/ रुपये तर जास्तीत जास्त ६५४५/ रुपये वाढ होणार आहे.

महासंघाच्या नेत्यांनी केंद्रीय नौकानयन मंत्री मा.श्री.सर्वानंद सोनोवाल, शिपिंग सचिव श्री. टी. के. रामचंद्रन,इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन श्री. राजीव जलोटा, व्यवस्थापकीय सचिव श्री.विकास नरवाल यांना धन्यवाद दिले.

मुंबईत झालेल्या अंतिम  वेतन करारावर  व्यवस्थापनाच्या वतीने इंडियन पोर्ट असोसिएशनचे चेअरमन राजीव जलोटा,  व्यवस्थापकीय सचिव विकास नरवाल, प्रादेशिक श्रम आयुक्त (केंद्रीय)  श्री. सुनील माळी तर कामगारांच्या वतीने ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन ( वर्कर्स ) चे (HMS) ॲड.एस. के. शेट्ये, सुधाकर अपराज,विद्याधर राणे, ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे(HMS) मोहम्मद हनीफ, केरसी पारेख, डी. के. शर्मा, जी.एम.कृष्णमूर्ती, एल. सत्य नारायणन, वॉटर ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे( CITU) नरेंद्र राव, सी.डी. नंदकुमार,  इंडियन नॅशनल पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे (INTUC) प्रभात सामंतराय, पोर्ट अँड डॉक वाटरफ्रंट वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया (AITUC ) बी.सी. मासेन,भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ( BMS) सुरेश पाटील यांनी  सह्या केल्या आहेत.

आपला 

मारुती विश्वासराव

प्रसिद्धीप्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या