मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण रॅली लाखोंच्या संख्येत समाज येणार, आयोजकांचा विश्वास

लातूर, प्रतिनिधी

सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, मराठा आंदोलानादरम्यान राज्यात मराठा बांधवावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत  या मागण्या मार्गी लावण्यासाठी १३ जुलैची दिलेली डेडलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी लातूर येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत आज मंगळवार ९ जुलै रोजी भव्य मराठा आरक्षण जनजागृती शांतता  रॅली काढण्यात येणार असून दुपारी १२ वाजता येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकातून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन रॅली मार्गस्थ होणार आहे. लाखोंच्या संख्येत समाज या रॅलीत सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांचे मंगळवारी दुपारी १२ वाजता नांदेडहून लातुरात आगमन होईल. विवेकानंद चौकात त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करुन  त्यांचे स्वागत होईल. ते स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यास अभिवादन करतील व राजर्षी शाहू महाराज चौकात आल्यानंतर ते राजर्षी शाहू  महाराजांच्या पुतळ्यास  अभिवादन करतील व रॅलीस सुरुवात होईल. गंजगोलाई, म. गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा रॅलीचा मार्ग असेल. या मार्गावर असलेल्या सर्वच महापुरुषांच्या पुतळ्यास जरांगे अभिवादन करतील. शिवाय गंजगोलाईतील देवीची ते आरतीही करतील. वाटेत विविध समाजाबांधवांच्या वतीने जरांगे यांचे स्वागत होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर ते शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. यावेळी जिजाऊ वंदना होईल. मराठा आरक्षण मागणीसाठी स्वताचे बलीदान दिेलेल्यांना यावळी श्रध्दांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर जरांगे सर्वांना संबोधीत करतील.

भव्य मंच

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात १२ फुट उंचीचा १५ बाय २० आकाराचा मंच उभारण्यात आला असून तेथून जरांगे समाजास संबोधीत करणार आहेत. या मंचावर जरांगे यांच्या व्यतीरीक्त कोणीही नसेल. त्या परिसरात २०० स्वयंसेवक असतील. तसेच बाजूस एक वेगळा मंच असेल तेथे जरांगे यांच्या आगमनापर्यंत शिवशाहीर पोवाडे सादर करतील. छत्रपतीशाहू महाराज चौकातही महिला शिवशाहीर पोवाड्यांचा कार्यक्रम होईल

स्वागत अन आदरातिथ्य

शहरात सुमारे ५० स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. जरांगे यांच्यावर विवेकानंद चौकात जेसीबीतून फुलांची उधळण होणार आहे तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रेनच्या साह्याने १५० किलोचा हार त्यांना घालण्यात येणार आहे. मार्गात विविध जाती धर्माचे बांधव त्यांचे यां स्वागत करणार आहेत. विशेष म्हणजे पार्कींग तसेच रॅली मार्गावर पाणी, अल्पोपहाराचे स्टॉल्स राहणार आहेत. मदतीसाठी अडीच हजार स्वयंसेवक आहेत.  शहरातील मेन रोड, औसा रोड, बार्शी व अंबाजोगाई रोडवरील अद्यावत १९ रुग्णालयांत  तातडीची आरोग्यसेवा उपलब्ध राहणार आहे. शिवाय चार रुग्णवाहिकाही असतील.

अशी असेल रॅलीची रचना

रॅलीच्या सर्वात पुढे जरांगे यांची गाडी असेल त्यांनतर महिला, मुली, वकील, डॉक्टर्स व सर्व समाजबांधव असतील. विविध सहा वाहनतळ (पार्कींग) असतील.  रॅलीसाठी १८ मुद्दयांची आचारसंहिता बनवण्यात आली असून तिची माहिती समाजास देण्यात आली आहे. ती पाळणे सर्वासाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

टिप्पण्या