लेक लाडकी योजनेत जिल्ह्यातील दोनशे लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा लाभ मुलींच्या सक्षमीकरणासह मुलींना लखपती बनवणाऱ्या लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड,14- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, एकूणच मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाच्या वतीने लेक लाडकी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत आज गुरुवार दिनांक 14 मार्च रोजी जिल्ह्यातील 201 लाभार्थ्यांना या योजनेतील पहिल्या हप्त्याचा लाभ देण्यात आला. कु. अद्विका अनिकेत पोहरे, वाडी बुद्रुक तालुका नांदेड व कु. आदिती ओमशिवा लामदांडे, मार्कंड तालुका नांदेड या दोन लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी महिला बाल विकास विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांची उपस्थिती होती.

     महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सदर योजना सुरू करण्यात आली आहे. पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यानंतर 6 हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर 7 हजार रुपये, अकरावीत गेल्यावर 8 हजार रुपये. अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये, अशा रीतीने एकूण त्या मुलीस 1 लाख 1 हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.

      ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर कुटुंबात जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असलेल्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा व त्यानंतर दुसरी मुलगी किंवा जुळ्या मुली जन्माला आल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळेल. जुळ्या दोन्ही मुलींना स्वतंत्र लाभ देण्यात येईल. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.

      या योजनेअंतर्गत आज जिल्ह्यातील 201 लाभार्थ्यांना 5000 रुपयाचा पहिला हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. यासाठी लाभार्थ्यांनी गावातील अंगणवाडी केंद्र किंवा तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास कार्यालयात संपर्क साधून प्रस्ताव सादर करावेत तसेच लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज