आपल्या बालसाहित्यासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित एकनाथ आव्हाड हे बालकुमारांचे आवडते लेखक आहेत. बालकथा, बालकविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी इ. वाङ्मयप्रकारांत त्यांची ३०हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते आपल्या लेखनात वेगवेगळे प्रयोग करतात. त्यामुळे शालेय आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश झालेला आहे. त्यांनी कथाकथनाचे ५००हून अधिक कार्यक्रम केले आहेत. त्यांचे बालसाहित्य राज्यस्तरीय विविध पुरस्कारांनी सन्मानित झाले आहे. अनेक बालकुमार साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. 'आपले सण आपली संस्कृती' हे त्यांचे नवीन पुस्तक साकेत प्रकाशनाने प्रकाशित केले आहे.
ह्या पुस्तकात ४ सामाजिक सण-उत्सव आणि ७ शालेय समारंभांची रंजक माहिती देणा-या ११ कथा आहेत. प्रत्येक शाळेत गांधीजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी केली जाते. 'शतायुषी हो' ह्या कथेत गांधीजींच्या जीवनाविषयी तीच ती माहिती न सांगता लेखकाने गोष्टीरूप संवादांच्या माध्यमातून गांधीजींच्या जीवनातील मूल्ये अधोरेखित केली आहेत. ह्या गोष्टीच्या ओघात छान छान गाणी येतात, कविता येतात. त्यामुळे कथा उत्कंठावर्धक आणि वाचनीय होत जाते.
मकर संक्रांती हा लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा आवडता सण. 'स्नेह वाटूया जनात' ह्या कथेत भोगी म्हणजे काय, तिळगुळाचे महत्त्व, पतंग उडवण्यामागची कारणे यांची माहिती मिळते. इतर राज्यांतील लोहडी, खिचडी, भोगाली बिहू, उत्तरायण, पोंगल ही संक्रांतीची नावे बालवाचकांच्या ज्ञानात भर घालतात. लेखकाने धातूमिश्रित मांजापासून बाळगोपाळांना सावध केले आहे. तिळगुळाइतकीच ह्या कथेची गोडी बालवाचकांच्या मनात रेंगाळत राहते.
३ जानेवारीला समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती येते. 'एक नवी सुरुवात' ह्या कथेत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती मिळते. शेवटी लेखकाने 'अडचणींचा डोंगर फोडून आपली पाऊलवाट निर्माण करण्याचा' संदेश दिला आहे.
रंगपंचमीच्या विविध रंगांत न्हाऊन निघायला बाळगोपाळांना फारच आवडते. 'रंगांतूनही हास्य उमलते' ह्या कथेत पर्यावरणपूरक होळी आणि रंगपंचमी कशी साजरी करायची, हे मुख्याध्यापक पाटील सर समजावून सांगतात. देशाच्या विविध भागांत बैठिका होळी, खडी होळी, होला मोहल्ला, ढोल जत्रा, शिग्मो, याओसांग, मंजल कुली, फगुआ, रॉयल होळी इ. नावांनी होळी कशी साजरी केली जाते, याची माहिती दिली आहे.
गणपती उत्सवात तर बाळगोपाळांच्या आनंदाला उधाण येते. अकरा दिवस बालकुमारांच्या मनात चैतन्याचे कारंजे फुलतात, म्हणून ह्या विषयावरील कथेला 'चैतन्याचे कारंजे' हेच शीर्षक दिले आहे. लेखकाने दूर्वांचे औषधी गुणधर्म, अष्टविनायकांची नावे, गणपती बाप्पांच्या अवयवांचे अन्वयार्थ सांगितले आहेत. गणेशोत्सवात कोणते कालसुसंगत बदल करावेत, हेही सुचविले आहे.
१५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन. 'देश हाच देव' ह्या कथेतील शमिका आपल्या शाळेत 'हुतात्मा शिरीषकुमार' ही गोष्ट सांगते. कथेचा नायक बाळू आपली 'प्रिय हा भारत देश' ही कविता सादर करून सगळ्यांची दाद मिळवतो. अशा गुणी लेकरांचा आईवडलांना अभिमान वाटतो.
गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. 'लाखमोलाची भेट' ह्या कथेची नायिका शीतल मोठी कल्पक आहे. ती आपल्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करून आगळीवेगळी गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा बेत आखते. फुलांवर होणारा खर्च टाळण्याचा प्रयत्न करते. सगळे मिळून आपल्या मुळेबाईंना 'बिनपटाची चौकट' हे पुस्तक भेट देतात. ती भेट पाहून बाई एकदम खूश होतात. ह्या कथेत लेखकाने 'बुके देण्यापेक्षा बुक भेट द्यावे' असा छान संदेश दिला आहे
१२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते. 'ज्ञानरूपी वसा' ह्या कथेचा नायक राघव हा वाचनप्रेमी विद्यार्थी आहे. त्याचे वडीलही पुस्तकप्रेमी आहेत. ते राघवला स्वामी विवेकानंदांचे चरित्र भेट देतात. लेखकाने ह्या कथेत 'शरीरसंपत्ती हीच खरी संपत्ती' हा संदेश दिला आहे.
५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. 'खारीचा वाटा' ह्या कथेतील मुले ह्या दिवसाचे औचित्य साधून सोसायटी परिसरात वृक्षारोपण करण्याचा बेत आखतात. त्यासाठी वर्गणी गोळा करतात. प्लॅस्टिकचा वापर करणार नाही, असा निर्धार करतात. पर्यावरण संवर्धनातील आपला खारीचा वाटा उचलण्याचा बाळगोपाळांचा हा संकल्प निश्चितच कौतुकास्पद आहे.
प्रत्येक शाळेत दरवर्षी १ ऑगस्ट रोजी टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तीच ती शेंगा आणि टरफलांची छापील भाषणे होतात. 'यशाची गुरुकिल्ली' ह्या कथेतील नायक राकेश नेहमीपेक्षा वेगळे विचार मांडतो. त्याचे गुरुजी त्याला टिळकांच्या विचारांतील ठामपणा आणि आत्मविश्वास आत्मसात करायला सांगतात.
दिवाळीचा सण म्हणजे बच्चेकंपनीसाठी पर्वणी असते. रोषणाई आणि खमंग फराळ यामुळे दिवाळीचा आनंद शतगुणित होतो. 'असाही एक संकल्प' ह्या कथेतील भागवत सर विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीचे महत्त्व पटवून देतात. कथेचा नायक बाळू यंदा दिवाळीत प्रदूषणकारी फटाके न फोडण्याचा निर्णय घेतो. आपली बहीण शमिकालाही ते पटवून देतो.
ह्या कथांमधील मालती, माधव, वैष्णवी, सई, सायली, बाळू, शमिका, शीतल, सुशांत, दीप्ती, राकेश, राघव, स्वाती ही बच्चेकंपनी आधुनिक पद्धतीने सण-उत्सव साजरे करून आपली संस्कृती आणखी समृद्ध करण्याचा प्रयत्न करते. त्यांचे आईवडील, आजीआजोबा आणि गुरुजन त्यांच्या पुरोगामी विचारांना खतपाणी घालतात. प्रसंगी त्यांना दिशा दाखवतात.
वेगवेगळे वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, गाणी, कविता यांमुळे ह्या कथांची गोडी आणखी वाढली आहे. डॉ. रवींद्र शोभणे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हा संस्कारक्षम कथांचा खजिना आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी ह्या पुस्तकाची पाठराखण केली आहे. घनश्याम देशमुख यांनी ह्या कथांना साजेशी चित्रे काढली आहेत. साकेत प्रकाशनाने आर्ट पेपरवर रंगीत छपाई करून ह्या पुस्तकाची अतिशय अप्रतिम निर्मिती केली आहे!
हा आगळावेगळा प्रयोग बालवाचकांना नक्की आवडेल, असा विश्वास वाटतो.
आपले सण आपली संस्कृती (बालकथा)
लेखक : एकनाथ आव्हाड
मुखपृष्ठ आणि आतील सजावट : घनश्याम देशमुख
प्रकाशक : साकेत प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठे ८०
किंमत रु. २५०
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

addComments
टिप्पणी पोस्ट करा