प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचे उद्गार
नांदेड - 'इटुकली पिटुकली' या बालकवितासंग्रहातील सुंदर बालकवितेच्या माध्यमातून कवयित्री मीनाक्षी आचमे यांनी बालमनाशी साधलेला हा निकोप संवाद आहे. हा बालकवितासंग्रह बालकांना निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी तर जगण्याबाबतची जीवनदृष्टी देते असे उद्गार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी काढले.
मीनाक्षी आचमे लिखित 'इटुकली पिटुकली' या बालकाव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ सांदीपनी पब्लिक स्कूल, तरोडा बु. नांदेड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. भगवान अंजनीकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुरेश सावंत, स्वाती कान्हेगावकर व सुनील राठोड हे उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागतगीत कु. क्षितिजा चित्तरवाड आणि कु. वीराक्षी चित्तरवाड यांनी म्हटले. प्रास्ताविक प्रकाशक दत्ता डांगे यांनी केले. यानंतर सुनील राठोड यांच्या हस्ते 'इटुकली पिटुकली' काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. यानंतर मीनाक्षी आचमे चित्तरवाड यांनी मनोगत व्यक्त केले. उत्सफूतपणे सूचलेल्या या बालकवितांचा संग्रह बालकांमध्ये बालगोष्टी, बालकविता वाचनाची गोडी लागावी म्हणून त्यांच्या हाती देत आहे असे त्यांनी म्हटले.
डॉ. सुरेश सावंत यांनी या काव्यसंग्रहावर भाष्य करताना पुढे म्हटले की, बालकांसाठी लिहिणे ही अवघड गोष्ट आहे. कारण त्यात लय, नाद, ताल, गेयता, अद्भुतरम्यता, शब्दचमत्कृती अर्थसमृद्धी या गोष्टी साधणे गरजेचे आहे. आणि या सर्व गोष्टी कवयित्रीने उत्तम प्रकारे साधल्या आहेत. यातील बालकविता गुणगुणाव्याशा वाटणाऱ्या आहेत असेही त्यांनी म्हटले.
स्वाती कान्हेगावकर यांनी म्हटले की, मीनाक्षी आचमे या संवेदनशील कवयित्री असून त्यांनी संस्कारक्षम बालकविता बालकांच्या हाती दिल्या आहेत. बालकांना भावणाऱ्या या कविता असून त्या बालविश्व समृद्ध करणाऱ्या आहेत असे म्हटले.
सुनील राठोड यांनी यावेळी काव्यसंग्रहाचे कौतुक करून लेखिकस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पंडित पाटील यांनी केले तर आभार कु. भाग्यश्री मनदुमले हिनी मानले.
या कार्यक्रमास प्रा. डॉ. जगदीश कदम, शीतल शहाणे, प्राचार्य दिगंबर मोरे, शंकर वाडेवाले, निर्मलकुमार सूर्यवंशी, प्र.श्री. जाधव, आनंद पुपलवाड, अशोक कुबडे, मा. मा. जाधव, उत्तम मांजरमकर, डॉ. सुनील गिरी, प्रा. महेश मोरे, प्रा. एम. आर. जाधव, प्रा. डॉ. माधव बसवंते, सुरेश जाधव, रमेश वंजे, सतीश कुलकर्णी, नंदकुमार केशटवार, आदी उपस्थित होते.

addComments
टिप्पणी पोस्ट करा