परभणीत आजपासून पुरुष व महिलांची (खुला गट) खो-खो स्पर्धा रंगणार

 राज्यातील ४८ संघाचा सहभाग : सायंकाळी सहा वाजता उद्घाटन सोहळा

परभणी (क्री. प्र.), १६ नोव्हें. : गुरुवारपासून (दि.१७) सुरू होणाऱ्या पुरुष व महिलांच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी येथील श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदान सज्ज झाले आहे. महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व परभणी जिल्हा खो खो असोसिएशनच्या वतीने २० नोव्हेंबरपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील महिला व पुरुष गटाचे ४८ संघ सहभागी होणार आहेत

या स्पर्धेसाठी ४ अद्यायावत मैदाने तयार करण्यात आली असून भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. खेळाडूंबरोबरच राज्य खो खो संघटनेचे पदाधिकारी, तांत्रिक व पंच समिती असे अकराशे जणांची निवास व्यवस्था व भोजन व्यवस्था संयोजन समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

सर्व खेळाडूंची निवास व्यवस्था ज्ञानसाधना प्रतिष्ठान, जिंतूर रोड परभणी येथे तर पंचाधिकारी, पदाधिकारी यांची निवास व्यवस्था शासकीय विश्रामगृह, कृषी विद्यापीठ वसतिगृह, हॉटेल्स आदी ठिकाणी करण्यात आली आहे. त्यांची निवासस्थान ते स्पर्धास्थळापर्यंत ने-आण करण्यासाठी संघटनेच्या वतीने वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा दिवस-रात्र प्रकाशझोतात खेळवण्यात येत आहे.

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन परभणी जिल्हा खो खो असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब जामकर यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. जामकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव प्रा. डॉ. पवन बारहाते पाटील, संतोष सावंत, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, रणजीत जाधव, प्रकाश टाकळे, राम चोखट व स्वयंसेवक प्रयत्नशील आहेत.

या स्पर्धेसाठी पुढील निवड समिती काम पाहणार आहे. किशोर पाटील (ठाणे), सुरेंद्र विश्वकर्मा (मुंबई), विजय बनसोडे (नाशिक), डॉ. वृषाली वारद (धाराशिव).

स्पर्धेची गटवार विभागणी पुढील प्रमाणे केली आहे.

पुरुष: अ-गट: मुंबई उपनगर, अहमदनगर, सिंधुदुर्ग. ब-गट: पुणे, परभणी, रायगड. क-गट: ठाणे पालघर, लातूर. ड-गट: सांगली, नंदुरबार, जळगाव. इ-गट: नाशिक, संभाजीनगर, नांदेड. फ-गट: मुंबई, रत्नागिरी, सातारा. ग-गट : सोलापूर, धुळे, हिंगोली. ह-गट: धाराशिव, बीड, जालना.

महिला: अ-गट: पुणे, जालना, सिंधुदुर्ग. ब-गट: ठाणे, रायगड, परभणी. क-गट: धाराशिव, धुळे, जळगाव. ड-गट: रत्नागिरी, पालघर, लातूर. इ-गट: सोलापूर, सातारा, नंदुरबार. फ-गट: सांगली, संभाजीनगर, हिंगोली. ग-गट: नाशिक, अहमदनगर, नांदेड. ह-गट: मुंबई, मुंबई उपनगर, बीड.


शुक्रवारपासून परभणीत सुरू होणाऱ्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी मैदानाची पाहणी करताना परभणी जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब जामकर, प्राचार्य जाधव, डॉ. पवन पाटील डॉ. संतोष सावंत व पदाधिकारी.

टिप्पण्या