सामाजिक व कामगार चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते - शशिकांत बनसोडे


मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील चार्जमन व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे हे मुंबई पोर्टच्या ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत असून, ते एक सामाजिक, राजकीय व कामगार चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. असे स्पष्ट उद्गार माजी सामाजिक न्याय मंत्री मा. चंद्रकांत हांडोरे यांनी सत्कार सोहळ्यात काढले.

मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता खात्यातील व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष शशिकांत बनसोडे यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा ३१ मे २०२३ रोजी मुंबई पोर्टच्या विजयदीप कॉन्फरन्स हॉलमध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी चंद्रकांत हांडोरे यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणात सांगितले की, पोर्टची सेवा ही एक प्रकारे देश सेवा आहे. बनसोडे हे एक सामाजिक कार्यकर्ते असून, त्यांनी चेंबूर मध्ये रहिवाशांचे प्रश्न सोडविण्यासाठी समस्या निवारण समितीची स्थापना केली आहे. शशिकांत बनसोडे यांनी रहिवाशांना नागरी सुविधा मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळेच चेंबूरमधील रहिवाशांना सुख सुविधा मिळाल्या आहेत. चिकाटीने काम करणारे ते कार्यकर्ते आहेत. महापुरुषांच्या विचार कृतीत आणले जातात. अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरून अनेक आंदोलने केली आहेत. समाजाचे ऐक्य झाले पाहिजे या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्न केले. बनसोडे खऱ्या अर्थाने माझ्या कार्याचे शिल्पकार आहेत. आम्ही भीमशक्ती संघटनेची स्थापना करून, या संघटनेमार्फत बहुजन समाजाची सेवा केली जाते.

ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शशिकांत बनसोडे यांना निष्ठेचे फळ मिळाले आहे. त्यांनी यापुढे समाजाची सेवा करावी. तशी संधी त्यांना राजकारणात मिळो. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पोर्ट ट्रस्ट कामगारांना घरे मिळाली पाहिजेत, ही आमची जुनीच मागणी असून, जर पोर्टच्या जागेवरील झोपडपट्टी धारकांना घर मिळत असेल तर पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना घरे का मिळू नयेत. त्यासाठी वेळ पडली तर आम्ही संघर्ष करू. डॉ. शांती पटेल यांच्या ८ ऑगस्ट जयंती दिनी शतक महोत्सव व युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त परेल येथील दामोधर हॉलमध्ये कामगारांचा कौटुंबिक मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास आपण उपस्थित राहावे.

युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, शशिकांत बनसोडे यांचे युनियनमध्ये आव्हानात्मक योगदान आहे. १०४ वर्ष झालेल्या युनियनचे ते उपाध्यक्ष आहेत. वेतन कराराबाबत मुंबईमध्ये नुकतीच द्विपक्षीय वेतन समितीचे मिटिंग झाली. आता पुढील मिटिंग १५ जून २०२३ रोजी मुंबईत होणार असून या मिटिंगमध्ये वेतन करार व पीएलआरचा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे. ही आपली मागणी आहे. गोदी कामगारांची ३० टक्के थकबाकी ताबडतोब देण्याची मागणी आपण केली आहे. मुंबई पोर्टमध्ये ४ हजार कामगार असून ३६ हजार पेन्शनर आहेत. दर महिन्याला पेन्शनसाठी १०० कोटी रक्कम वाटावे लागतात.

युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड नंबर दत्ता खेसे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सरकारच्या धोरणानुसार कामगार भरतीवर बंदी असल्यामुळे कामगार भरती होत नाही, त्यामुळे केवळ सेवानिवृत्तीचे कार्यक्रम होत आहेत. मुंबई पोर्टची आर्थिक परिस्थिती पूर्वी खालावली होती. परंतु आता पोर्ट ट्रस्टची आर्थिक स्थिती चांगली आहे. आपण १ तारखेला पगार व पेन्शन वेळेवर देतो. मुंबई पोर्टला १५० वर्षे पूर्ण झाली असून गेल्या वर्षी ६३.६८ दशलक्ष टन मालाची चढ-उतार झाली. हा एक गेल्या १५० वर्षातला इतिहास आहे. 

युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे यांनी भारतातील २३६ सार्वजनिक उद्योगांपैकी पोर्ट उद्योग एक चांगली सेवा देणारा उद्योग आहे. पगार, पेन्शन व इतर सवलती गोदी कामगारांना चांगल्या प्रकारे मिळतात. मुंबई व अलंग येथील जहाज तोडणी उद्योगातील असंघटित कामगारांना संघटित करून त्यांना न्याय देण्याचे काम संघटनेमार्फत केले जाते.

युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, युनियनमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कुटुंबाकडे लक्ष देऊन समाजासाठी कार्य केले पाहिजे. असे स्व. डॉ. शांती पटेल नेहमी सांगत होते. समाजाला शशिकांत बनसोडे सारखा कार्यकर्ता हवा आहे. 

याप्रसंगी विजय कदम, विजय कांबळे, सरोदे, विजय काशिलकर, शंकरअप्पा, विठोबा पवार, तात्यासाहेब खांडेकर, सपना बनसोडे, इत्यादी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सभेचे सुंदर सूत्रसंचालन युनियनचे खजिनदार विकास नलावडे यांनी केले. या सत्कार सोहळ्यास युनियनचे पदाधिकारी सर्वश्री विजय रणदिवे, निसार युनूस, मनीष पाटील, विष्णू पोळ, मारुती विश्वासराव इत्यादी मान्यवर, कामगार, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 आपला 

 मारुती विश्वासराव 

प्रसिद्धी प्रमुख 

मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

टिप्पण्या