संविधानाचे संरक्षण करणे भारतीयांची नैतिक जबाबदारी - फारुख अहमद

 

नांदेड,प्रतिनिधी
भारतीय संविधानाचे संरक्षण करणे त्याचे जतन करणे ही प्रत्येक भारतीयांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राजे प्रवक्ते फारूक अहमद यांनी केले आहे.
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते दीपक कसबे यांच्या पुढाकारातून नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रभाग क्रमांक चार मधील सेवानिवृत्त कर्मचारी व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांनी मार्गदर्शन केले.
 सेवानिवृत्त कर्मचारी हा समाजातील एक बुद्धिजीवी व अनुभवशील नागरिक असतो. शासकीय सेवेत प्रदीर्घ सेवा केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी असतो. दरम्यान देशात व राज्यात सुरू असलेल्या अनेक घडामोडींचा अभ्यासही या वर्गाला असतो. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर या नागरिकांचा समाजाला एक वेगळा उपयोग होत असतो. सामाजिक राजकीय व अशा अनेक चळवळीला पाठबळ देण्याची ताकद या वर्गात असते. म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाने सामाजिक योगदान देताना अनेक बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. देशात सध्या सामान्य नागरिकांच्या विरोधी अनेक निर्णय घेतल्या जात आहेत. केंद्रातील सरकार देशातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास असमर्थ ठरले आहे. त्याचबरोबर देशात वाढती बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगाराचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिला वरील अत्याचार, धार्मिक तेढ असे अनेक कळीचे मुद्दे निर्माण झाले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमुळे देशाच्या संविधानाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर आदर्श लोकशाही म्हणून परिचित असलेल्या या देशाची लोकशाही धोक्यात येते की काय? अशी भीती वाटत आहे. त्यामुळे देशात शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक व जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे. देशाची राष्ट्रीय एकात्मता टिकली पाहिजे. एकूणच या देशाचे संविधान सुरक्षित राहिले पाहिजे. आणि देशाचे संविधान सुरक्षित ठेवण्याची नैतिक जबाबदारी देशातील बुद्धिजीवी नागरिकांची आहे. असे यावेळी   फारुख अहमद   म्हणाले.
 यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. गोविंद दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनीही या कार्यक्रमाला संबोधले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विक्रीकर अधिकारी तथा ओबीसी नेते सोपानराव मारकवाड होते, तर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव शाम कांबळे, माधव जमदाडे, डॉक्टर राम वंनजे, के. एच. वने यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. माता रमाई यांच्या स्मृतींना अभिवादन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ नेते दीपक कसबे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कष्ट घेतले. या प्रभागातील तब्बल 100 च्या वर निवृत्त कर्मचारी व अधिकारी त्याचबरोबर विविध क्षेत्रात आपले सामाजिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन व आभार जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर ढवळे यांनी केले.
टिप्पण्या