कु. राधा जोशीचा कवितासंग्रह 'कुहूकुहू' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.




कु. राधा जोशी ही नागपूरचे सिद्धहस्त चित्रकार विकास जोशी यांची कन्या. राधेला नववीत शिकत असल्यापासून कविता लिहिण्याचा छंद आहे. ती छान छान चित्रंही काढते. कविता आणि चित्र ही दोन्ही तिची अभिव्यक्त होण्याची सशक्त माध्यमं आहेत. 

राधेचा 'कुहूकुहू' हा देखणा बालकवितासंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. ३२ पृष्ठांच्या ह्या संग्रहात एकूण १६ बालकविता आहेत. ह्या कवितांमध्ये विषयांची विविधता आहे. यात राधेच्या मनाचं फुलपाखरू मनसोक्त भिरभिरताना दिसतं.

'केशरी आकाश

निळे निळे पाणी'

असे ह्या कवितेचे जग रंगीबेरंगी आहे.

राधेच्या कवितेच्या हिरव्या जंगलात वनराणीही हिरवीच आहे. ह्या कवितेच्या तळ्यात लाल पिवळ्या मासोळ्या आहेत. 

विश्वास बसत नाही ना? 

बसणारच नाही, कारण हे कवितेचं जग आहे. ह्या जगात काहीही घडू शकतं. 

आता हेच पाहा ना! 

गंपू आणि भूत हे दोघे बेस्ट फ्रेंड आहेत. 

उडालात ना? उडणारच ना! 

ह्या भुताला पदार्थ आवडतात दाळीचे आणि पांघरायला पान आवडते केळीचे. 

आता बोला! ते भूतही चांगलं आहे बरं का! 

राधेच्या कवितेत भुताचं जग आणि कॉप्म्प्यूटरचं जग हे दोन्ही एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात. कॉप्म्प्यूटरच्या जगाचे बरेवाईट परिणाम राधेला माहीत आहेत. म्हणूनच तिला प्रश्न पडला आहे :

'जग झालेय आधुनिक 

कोण वाचतेय मासिक?' 

'कॉप्म्प्यूटरच्या जगामुळे

हरवली आहेत पुस्तके' 

ही राधेच्या मनातील खंत आहे. 


कधी फुलांचे, कधी फळांचे, कधी रंगांचे, तर कधी पशुपक्ष्यांचे संमेलन भरते, हे आपण आजवर बालकवितेत वाचले होते. पण राधेच्या कवितेत 'भाज्यांची मॉलमीट' भरली आहे. सगळ्या पालेभाज्या, फळभाज्या एकत्र जमल्या आहेत आणि त्या आपापले मोठेपण सांगताहेत:

'मेथी, पुदिना, शेवगा, बीट

आरोग्य तुमचे ठेवील नीट' 

संमेलन असो, जत्रा असो की मीट, भाज्यांचे भोजनातील महत्त्व बालकुमारांच्या मनावर बिंबविणे महत्त्वाचे. 


कविता ही जणू राधेची मैत्रीण आहे. राधेनं कविता लिहायचं ठरवलं, की शब्द तिच्या मदतीला धावून येतात. म्हणून राधा म्हणते:

'कविता ही

अर्थपूर्ण अस्त्र 

अक्षरांचे रसायन

मंत्रमुग्ध गायन

कविता ही'. 

राधेच्या मते कवितेचं हे सामर्थ्य आहे. 

ह्या पुस्तकात काही कथाही कवितेच्या रूपात अवतरल्या आहेत. 

एकदा चंद्र आणि सूर्य यांचे भांडण झाले. दोघेही दोन्हीकडे रुसून बसले. दोघेही म्हणू लागले, मीच श्रेष्ठ! मग देवानेच वाटणी करून त्यांचे भांडण मिटविले

'सूर्याचा मान दिवसाला

चंद्राचा मान रात्रीला'. 

राधेच्या कवितेत दिवाळी आपल्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगत आली आहे. 

एक, दोन, तीन, चार ह्या अंकांवर आपल्याकडे भरपूर बालकविता आहेत. ह्या संग्रहात राधेची एक ते शंभर अंकांवरची 'नंबरी नंबर' ह्या शीर्षकाची कविता आहे. नंबरही नंबरी असतात बरं का! ह्या कवितेत प्रत्येक अंकाचे वैशिष्ट्य सांगितले आहे. आता हेच पाहा:

'एक आणि नऊ 

जोडी नाईस

झाला नंबर 

एकोणवीस'. 

ह्या कडव्यात नाईस आणि नंबर हे दोन इंग्रजी शब्द आले आहेत. याचे कारण उघड आहे. राधेचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. 

सर्कशीतील विदूषक हा बाळगोपाळांचा आवडता दोस्त. कारण तो नेहमी टिवल्याबावल्या करतो. गमजा करून हसवतो. तो कधीच रडत नाही.उलट तो सदैव हसरा चेहरा ठेवतो. म्हणून राधेला वाटते :

'विदूषक नसेल तर

कोण हसेल?

सर्कस पाहण्याचा 

बेतच फसेल'. 

पुस्तक हा राधेचा चांगला मित्र आहे. 

'वाचन करू, करू ताठ मान'

हा राधेचा विश्वास आहे. 

पुस्तकांत काय नाही?

'अवघे विश्व, नऊ रस

कधी स्वारी, कधी वारी

कधी निसर्ग, कधी परी

एकदा उघडून बघा तरी' 

ख-या पुस्तकाशिवाय मज्जा नाही, असा विश्वास राधेने व्यक्त केला आहे. 

पंढरपूरची विठूमाऊली म्हणजेच सावळानाथ. ह्या सावळ्यानाथालासुद्धा

राधेच्या कवितेत येऊन बसण्याच्या मोह आवरता आला नाही. 

'वेड्यांचा बाजार' हे एक कथाकाव्य आहे.

एकदा एका सशाच्या पाठीवर झाडाचे पान पडते. आभाळ पडले, म्हणून तो पळायला लागला. त्याला पाहून कोल्हा, वाघ, चिमणी, साप, हत्ती हे सगळेच पळायला लागले. एक घुबड मात्र नेक विचार करतं आणि म्हणतं

'इथे भरलाय 

वेड्यांचा बाजार 

ससुला झाला

फक्त बेजार'. 

जगाने अशुभ ठरविलेल्या घुबडानेच वेड्यांच्या बाजाराचे डोळे उघडले आहेत.

राधेला अपेक्षित असलेले 'कवींचे जग' मोठे मजेशीर आहे. ह्या जगात :

'प-यांची रेलचेल असावी

प्राणिमात्रांना भाषा यावी

दडपण कशाचे नको

चिंता, काळजी काही नको

माणुसकीचे दर्शन व्हावे'

अद्भुतरम्य जगात रमतानाही राधेला माणुसकीच महत्त्वाची वाटते. 

'वीज कडाडली

कडकडकड

आभाळ गरजले 

गडगडगड' 

किंवा 

'झरझर झरझर 

वाहती वारे

इंद्रधनूचे

रंग न्यारे'

अशी अक्षरांची पुनरावृत्ती करून राधेने आपल्या कवितेत छान नाद, लय, ताल साधला आहे. 

राधेचे शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेले असल्यामुळे आणि मराठीपेक्षा तिच्या ओठांवर इंग्रजी शब्दच अधिक खेळत असल्यामुळे ह्या पुस्तकात फास्ट फ्रेंड, एंड, कॉंप्यूटर, स्मार्ट, बाय हार्ट, इंटरनेट, फेसबुक, लेटेस्ट, मॉलमीट, पिझ्झा, बर्गर, इंग्लिश, डिझाईन, नाईस, ऑनलाईन अशा परभाषीय शब्दांची रेलचेल आहे. त्याने काही बिघडत नाही. भाषेपेक्षा भाव महत्त्वाचे आहेत. इंग्रजी माध्यमात शिकलेली मुले मराठी साहित्याकडे वळत नाहीत, हा सार्वत्रिक समज राधेने 'कुहूकुहू' लिहून खोटा ठरविला आहे. 

 राधेच्या बालकवितेत कल्पनारम्यता आहे, अद्भुतरम्यता आहे. तिने यमक आणि प्रास साधून कवितेत नादमाधुर्य आणले आहे. 'कुहूकुहू' हे संग्रहाचे शीर्षकच मुळी नादमधुर आहे. राधेची कविता ही अल्पाक्षररमणीय आहे. ह्या कवितेत शब्दचमत्कृती आहे आणि अर्थसमृद्धीही आहे. राधेच्या कवितेत कल्पनांची तरलताही आहे आणि नवलाईही आहे. राधेची ही बालकविता म्हणजे निरागस, निखळ, निर्मळ आणि निष्पाप बालमनाचा उत्कट आविष्कार आहे. राधेच्या कवितेतला निसर्ग हा हसता, खेळता, धडपडता निसर्ग आहे. ही कविता आनंदनिर्मिती तर करतेच, शिवाय बालकुमार वाचकांसाठी काही एक मूल्यसंस्कार देऊन जाते.

मुलीच्या पुस्तकाला वडलांची सजावट हा दुर्मीळ योग ह्या पुस्तकात जुळून आला आहे. खूप वर्षांपूर्वी विकास जोशी पुस्तकांची मुखपृष्ठं आणि आतील सजावट करत असत, पण हल्ली ते चित्रप्रदर्शनांत इतके व्यग्र आहेत, की त्यातून त्यांना वेळच मिळत नाही. 'कुहूकुहू'चे बोलके मुखपृष्ठ आणि आतील आनंददायी चित्रे विकास जोशी यांनी काढली आहेत. राधेने बालकवितेचे सुंदर मंदिर बांधले आणि विकास जोशी यांनी त्यावर आपल्या कुंचल्याने चित्रांचा सोनेरी कळस चढविला, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. यासाठी बापलेकीचे हार्दिक अभिनंदन!

पुस्तकाची पाठराखण करताना दासू वैद्य यांनी म्हटल्याप्रमाणे राधा निरागसपणे भोवताल रंगवताना ती भोवताल समजून घेण्याचाही प्रयत्न करते. राधेचे कलावंत मन ह्या प्रत्येक कवितेत डोकावते आहे. मुखपृष्ठावरील मुलीच्या डोक्यावर कोकिळा बसली आहे. याचा अर्थ ह्या पुस्तकात शब्द, स्वर, चित्र आणि संगीताचे मधुर मिश्रण जमले आहे.

'कुहूकुहू' म्हणजे राधेच्या नादमधुर बालकविता, विकास जोशी यांची बोलकी चित्रे आणि इसाप प्रकाशनाचे दत्ता डांगे यांनी केलेली पुस्तकाची अप्रतिम निर्मिती यांचा त्रिवेणी संगम होय.

'कुहूकुहू' ( बालकवितासंग्रह)

कवयित्री : राधा जोशी

मुखपृष्ठ व सजावट : विकास जोशी

प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड

पृष्ठे ३२. किंमत रु. ६०

टिप्पण्या