*गिरणी कामगार संघटक दिनकर मसगे यांचे निधन!एक कार्यकुशल संघटक हरपला! रामिम संघाची आदरांजली!





   मुंबई दि.५: राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या गिरणी कामगार गृहनिर्माण विभागाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख आणि माजी संघटन सचिव दिनकर मासगे यांचे काल त्यांच्या राहत्या कुडाळातील पिंगुळी गुढीपूर गावी अल्पशा आजाराने निधन झाले( ७१).त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, स्नुषा, नातवंडे असा कुटुंब परिवार आहे.दिनकर मसगे यांच्या आकस्मित निधनाने संघटनेचे एक कार्यकुशल संघटक हरपले,अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर,सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आदरांजली वाहिली आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे माजी संघटन सचिव दिनकर मसगे बॉम्बेडाइग(कपडा खाते) मिल मधील निवृत्त प्रतिनिधी असून संघटनेच्या अनेक लढ्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहीला आहे.नाट्य कलेत निपूण असलेल्या दिनकर मसगे यांनी कामगार कल्याण मंडळाच्या एकांकिका स्पर्धांमध्ये प्रथम अभिनयाची बक्षिसे मिळविली आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने 'गुणवंत कामगार पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.जिल्ह्यातील अनेक गिरणी कामगारांच्या घरांचे प्रश्न सोडविण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.ठाकर समाजाच्या समस्या शासकीय पातळीवर सोडविण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे.ते ठाकर समाजाचे माजी कार्याध्यक्ष होते.त्यांच्या निधनाने ग्रामीण तसेच मुंबईच्या गिरणगावात शोककळा उमटवून आलेली दिसते.संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी म्हटले आहे, त्यांच्या निधनाने संघटनेचा‌ निष्ठावंत संघटक हरपला आहे.त्यांच्या रहात्या गावातील स्मशानभूमीत त्यांच्या वर अंत्यसंस्कार पार पडले. **********

टिप्पण्या