देशातील बस वाहतूक उद्योग टिकवण्यासाठी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार*



महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि तामिळनाडू रोड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन व दिल्ली ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन एम्प्लॉईज काँग्रेस या महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, राज्यातील वाहतूक क्षेत्रातील तीन संघटनांनी सार्वजनिक बस वाहतूक सेवा क्षेत्रातील वाढते खाजगीकरण,  वाढते कंत्राटीकरण याबाबत चिंता  व्यक्त केली असून त्यासाठी संयुक्तपणे या तिन्ही संघटना लढा उभा करीत आहेत. असे हिंद मजदुर सभेचे नेते शिवगोपाल मिश्रा,  वेणू गोपाल नायर व हनुमंत ताटे यांनी  आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी त्यांनी सांगितले की, स्वच्छ शहरे, प्रदूषण मुक्त शहरे, हरित शहरे ही संकल्पना अनेक राज्यांमध्ये राबवली जात आहे. परंतु असे  उपक्रम राबविताना सार्वजनिक बस वाहतुक  क्षेत्रातील कामगारांना विसरून चालणार नाही.  सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था ही या संकल्पनेचे भविष्य आहे. कारण या क्षेत्रातील कामगारच या शहरांना गतिमान करण्यासाठी व धावते ठेवण्यासाठी मदत करीत आहेत. त्यामुळे स्वच्छ व हरित शहरांचे स्वप्न  पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बस वाहतूक उपक्रम साह्यभूत ठरेल. याची खात्री देण्यासाठीच आम्ही आमच्या मागण्या अधोरेखित करून एकजुटीने उभे राहत आहोत. असे या तीन संघटनानी ठासून सांगितले आहे. वाढत्या तोट्याचे कारण पुढे करीत,  आज अनेक  सार्वजनिक वाहतूक महामंडळे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण करीत आहेत. फायद्याचे मार्ग खाजगी बस वाहतुकीस खुले करून देण्यात येत आहेत. आणि डेपो व विभागाची देखभाल दुरुस्ती सारखी कामे बाहेरील एजन्सीकडे सोपवली जात आहेत. महाराष्ट्रामध्ये पण मेक्सिकॅब्ला परवानगी देण्याचे  धोरण  मंजूर करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मोठ्या प्रमाणावर भाडेतत्त्वावर गाड्या घेतल्या जात आहेत. स्वमालकीच्या गाड्या घेण्यास  प्राधान्य दिले जात नाही.  या वाढत्या खाजगीकरणामुळे महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर प्रतिकूल परिणाम होत असून,  कामगारांचे मान्य केलेले आर्थिक प्रश्न सोडविले जात नाहीत.  कामगारांच्या हक्काचे वेतन पण देय तारखेला होत नाही. शासन प्रशासनाच्या या भूमिका सार्वजनिक बस वाहतूक उद्योगासाठी मारक ठरत आहेत. त्यासाठीच  दिल्ली, महाराष्ट्र व  तामिळनाडू येथील दिल्ली ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन  एम्प्लॉईज काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि तामिळनाडू रोड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियन या तिन्ही संघटनानी संयुक्तपणे पत्रक काढून हा सार्वजनिक  बस वाहतूक उद्योग टिकवण्यासाठी एकत्रित लढा उभा  केला आहे.  या लढ्यासाठी इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेशन या तिन्ही संघटनाच्या  सोबत ठामपणे उभे आहे.  दिल्ली महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथील सार्वजनिक बस वाहतूक क्षेत्रातील जे शहरी वाहतुकीचा अविभाज्य भाग आहेत आणि  त्यासाठीच आम्ही ठामपणे आमचे संयुक्त मागणीपत्र  आमच्या प्रशासनास व शासनास  देत आहोत.  आम्ही संयुक्तपणे एकत्र येऊन पुढील लढा लढणार आहोत, आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, तामिळनाडू  रोड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी सुब्रमण्यम पिल्ले, दिल्ली ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन एम्प्लॉईज काँग्रेसचे  मनोज यादव,  राज्य महिला संघटक सचिव शीला संजय नाईकवाडे सहभागी झाले होते. ऑल इंडिया रेल्वेमन फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी शिव गोपाल मिश्रा नॅशनल रेल्वेमन युनियनचे  जनरल सेक्रेटरी वेणूगोपाल नायर यांनी या अभियानास पाठिंबा दर्शविला आहे.

टिप्पण्या