रामिम संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर शिवशक्ती जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित



    मुंबई दि.२९: गिरणी कामगार चळवळीत गेली ४० वर्षे निस्पृह आणि निरलस वृत्तीने कार्यरत असणारे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांना श्री शिवशक्ती सामाजिक प्रतिष्ठानच्या विद्यमाने मानाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   परेलच्या मनोहर फाळके सभागृहात रविवारी पार पडलेल्या १८ व्या राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुंबईचे निवृत्त पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते अण्णा शिर्सेकर यांना हा पुरस्कार देऊन त्यांच्या त्यागमयी सेवेबद्दल गुणगौरव करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप शाल,श्रीफळ आणि स्मृती चिन्ह असे होते.

   या प्रसंगी समाजात त्यागमयी वृत्तीने कार्य करणारे उरण मधील ज्येष्ठ समाज सेवक भाऊसाहेब पाटील यांनाही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना, निवृत्त पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर म्हणाले,समता, बंधुत्व आणि न्याय लढून मिळत नाही.ते मिळवावे लागतात. त्यासाठी माणसातील माणूसपण जोपासता आले पाहिजे.

    संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र पाटील आपल्या स्वागताच्या भाषणात म्हणाले,आम्ही आदिवासी पाड्यात जाऊन पीडित समाजाला जगण्याचे बळ दिले आहे.

    या प्रसंगी मुंबईचे सेवा निवृत्त पोलिस उपायुक्त आर.एन.तडवी, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, आदींनी मार्गदर्शन केले.

    या कार्यक्रमात समाजातील सेवाभावी वृत्तीने कार्यकरणाऱ्या समाजसेवकांना उद्योगरत्नं, शिक्षण संगोपन,सहकाररत्न सेवाकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कवी सौ.फरजा न डांगे यांनी आपल्या सुरस कविता पेश करुन कार्यक्रमाची रंजकता वाढवली. 

    रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांनी बोनस,पगारवाढी पासून ते अगदी बंद गिरण्या सुरु करा,या मागण्यावर मुंबई ते‌ दिल्ली पर्यंतच्या लढ्यात सहभाग घेतला आहे.गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावरील लढ्यात झोकून दिले आहे.ही कामे करताना ग्रामीण पातळीवरील प्रश्न सोडविण्यातही तितकेच योगदान दिले आहे,त्या बद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते त्यांच्या वतीने निवृत्ती देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन अण्णा शिर्सेकर यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या