सविता करंजकर जमाले यांची 'फ्रूटी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

 

लहान मुलांना कुत्रा, मांजर, पोपट, कबुतर असे पशुपक्षी पाळायला आणि त्यांच्यावर जीव लावायला फारच आवडते. बाळगोपाळांचे ते सखेसवंगडीच असतात. घरच्या लोकांनी पाठिंबा दिला, तर लहाग्यांचे हे स्वप्न साकार होते. आईवडलांनी विरोध केला, तर मात्र बालमनाची ही इच्छा अपूर्ण राहून जाते. बालसाहित्यात ह्या विषयावर आजवर अनेक गोष्टी आल्या आहेत. वा. ग. पूर्णपात्रे यांची 'सोनाली', प्रा. लीला शिंदे यांची 'जिनी' आणि धारा भांड यांचा 'टिटुडू' हे माझ्या विशेष लक्षात राहिले आहेत. 

सविता करंजकर जमाले यांची 'फ्रूटी कोणाची?' ही बालकादंबरी ह्याच विषयावर बेतलेली आहे. ह्या कादंबरीचे कथानक फारच तरल, भावस्पर्शी आणि उत्कंठावर्धक आहे. चौथीत शिकत असलेला नरेंद्र हा ह्या कादंबरीचा नायक आहे. विवेकानंदांसारखा गुणी बाळ, म्हणून नरेंद्र नाव ठेवले असले, तरी घरीदारी सगळे त्याला नंदू किंवा नंद्या म्हणतात. नंदू आणि स्वीटी हे एकाच शाळेत आणि एकाच वर्गात शिकत असल्यामुळे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड आहेत.

नंदूच्या घरी आईबाबा आहेत, आजी आहे आणि सातवीत शिकणारी बहीण ओवी अर्थात तायडा आहे. जगातले सगळे आईबाबा सारखेच असतात, हे नंदूचे मत. आईची लाडकी तायडा म्हणजे हिटलरच दुसरा. ओवी वयाने जरा मोठी असल्यामुळे धाकट्या भावावर ताईगिरी करणारच!

स्वीटीने आपल्या घरी एक मांजर पाळली आहे. तिचं नाव आहे फ्रूटी. फ्रूटी हा स्वीटीचा जीव की प्राण आहे. एके दिवशी स्वीटीकडे राहायला तिची अंजूआत्या येते. अंजूआत्याला एक लहान बाळ आहे. फ्रूटी बाळाला बोचकारेल, अशी आत्याला भीती वाटत असते. आत्या फ्रूटीला कुठे तरी दूर नेऊन सोडायला स्वीटीच्या बाबांना सांगते. गंमत म्हणजे बाबाही तयार होतात. आत्या आणि बाबा यांचे हे वागणे स्वीटीला अजिबात आवडत नाही. स्वीटी रडायलाच लागली. इतक्या लाडक्या फ्रूटीला दूर सोडून द्यायचं म्हणजे काय? पण काय करणार? मोठे सगळे असेच वागतात, छोट्यांच्या मनाविरुद्ध.

यावर काही तरी मार्ग तर काढलाच पाहिजे. स्वीटी काही दिवसांसाठी फ्रूटीला नंदूकडे ठेवायचा निर्णय घेते. पण यातही एक अडचण आहे. नंदूच्या घरी तायडीचा आवडता कुत्रा आहे. टायगर त्याचं नाव. टायगर सगळ्या गल्लीची राखण करायचा. त्यामुळे तो सगळ्यांचा लाडका. फ्रूटीला सांभाळण्याच्या मोबदल्यात स्वीटी दररोज नंदूचा गृहपाठ करून देणार आहे, तोही सुवाच्य अक्षरांत. दोघांचा असा गुपचूप अलिखित करार झाला. बेस्ट फ्रेंडसाठी एवढे तर करावेच लागते. 

फ्रूटी आहेही तशीच देखणी. शुभ्र पांढरा रंग अन् निळेशार देखणे डोळे. तिचं अंग तर कापसापेक्षा मऊ. घरच्या कोणालाही खबर न लागू देता नंदूने फ्रूटीला गुपचूप घरी आणले. फ्रूटी नंदूचे तोंड चाटायला लागली, खूप जुनी ओळख असल्यासारखी.

नंदूने आपल्या खोलीत, एका कोपर्‍यात जुनी ब्लॅंकेट अंथरून मऊ बिछाना तयार करून दिला. मांजर घरात आणली, हे समजले असते, तर सगळ्यांनी मिळून नंदूची चंपीच केली असती. संध्याकाळचे जेवण झाल्यावर नंदूने आईला ग्लासभर दूध मागितले. दूध प्यायला कंटाळा करणारा नंदू आज दूध मागतोय, याचे आईला आश्चर्य वाटले. आईला वाटलं, नंदू गुड बॉय झाला आहे. फ्रूटीसाठी दूध घेतले आहे, हे आईला माहीतच नव्हते.

नंदूने फ्रूटीला घरी आणले, हे पहिल्यांदा समजले आजीला. फ्रूटीसाठी वेगळे अंथरूण केले, तरी ती नंदूच्या अंथरूणातच झोपायची. दुसर्‍याच दिवशी फ्रूटीने नंदूच्या अंथरूणात शी केली. हे नंदूला उठवायला आलेल्या आईला वासावरून समजले. 'गरीब गाय अन् पोटात पाय' ही म्हण आपल्याला माहीत होती. नंदूला आता नवीनच म्हण सापडली, 'गरीब मांजर अन् बिछान्यात घाण'. आजीला आधीच माहीत झाले होते. आता आईसमोरही बिंग फुटले. आईला समजले म्हणजे बाबांना समजले आणि ताईलाही. घरातल्या सगळ्यांना फ्रूटी नकोशी आणि फक्त नंदूला हवीहवीशी. घरातले सगळे लोक आणि फ्रूटी यांच्यामध्ये नंदूचे सॅंडविच झाले होते. 

शी सू करण्यासाठी, झोपण्यापूर्वी फ्रूटीला बाहेर फिरायला न्यावे लागते, हे स्वीटीने नंदूला दुसर्‍या दिवशी सांगितले. हे आधीच नको सांगायला? उलट स्वीटी म्हणाली, 'नंद्या, तुझ्या संगतीनं माझी फ्रूटी बिघडली'. 

नंदूने फ्रूटीला बाथरूममध्ये नेऊन स्वच्छ अंघोळ घातली.

 फ्रूटीची परवानगी घेऊन नंदू शाळेत गेला. एके दिवशी फ्रूटीने बोचकारून तायडीचा आवडता ड्रेस फाडून टाकला. आता तर फ्रूटीने चक्क हिटलरशीच पंगा घेतला होता. शिंदेकाकू ह्या गल्लीत भांडकुदळ म्हणून प्रसिद्ध! त्यांच्या घरात उंदीर फारच झाले होते. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी, आईच्या परवानगीने त्या फ्रूटीला आपल्या घरी घेऊन गेल्या. नंदू घरी आल्यावर त्याला हे समजले. तो फ्रूटीला आपल्या घरी घेऊन आला. 

आता नंदूने फ्रूटीच्या शी सू ची जबाबदारी घेतली. आई फ्रूटीला दूधपोळीचा कुस्करा करून देत असे. फ्रूटी गुड गर्लसारखी वागत असे. 

एके दिवशी नंदूने फ्रूटीला दप्तरात टाकून शाळेत नेले. वर्ग चालू असताना ती दप्तरातून बाहेर निघाली आणि तिने वर्गात गोंधळ घातला. शिपाई चंदूकाकाने फ्रूटीला पकडून दूर नेऊन सोडले. नंदू काहीच करू शकला नाही. स्वीटी त्याच्यावर खूप रागावली. नंदूने वर्गाबाहेर पडून फ्रूटीचा खूप शोध घेतला. दोन तीन मुले फ्रूटीला पकडून तिला खूप त्रास देत होते. ऐनवेळी तायडा मदतीला धावून आली. त्या दुष्ट मुलांच्या तावडीतून फ्रूटीची सुटका केली. दोघे बहीणभाऊ फ्रूटीला घेऊन उशिराच घरी आले. त्यामुळे नंदूला सगळ्यांचाच ओरडा खावा लागला. 

भरीस भर म्हणजे नंदूचा गृहपाठ स्वीटी करून देते, हेही सगळ्यांना समजले. हे सगळं त्या मांजरीमुळं होतय, 

असा निष्कर्ष आईबाबांनी काढला. सगळ्याचं मूळ असलेली फ्रूटी मांजर दूर नेऊन सोडून द्यावी, असे सर्वानुमते ठरले. आज रात्रीच्या ऐवजी उद्या सकाळी सोडावे,असा सल्ला आजीने दिला. 

त्या रात्री एक चमत्कार घडला. ज्या खोलीत नंदू आणि तायडा झोपले होते, त्या खोलीत एक अस्सल नाग आला. फ्रूटीने पंजा मारून नागाला जखमी केले. बाबांनी नागाला काठीवर उचलून बाहेर नेऊन फेकून दिले. 

सगळ्यांच्याच डोळ्यांत सापाची भीती दाटली होती. फ्रूटीमुळे आपल्या दोन्ही लेकरांचे प्राण वाचले, म्हणून सगळेच सद्गदित झाले होते. फ्रूटीच्या शरीराला सापाचे रक्त लागले होते. नंदूने आणि आईने मिळून फ्रूटीला स्वच्छ अंघोळ घातली. फ्रूटी फारच गुणी असल्यामुळे तिला आपल्याच घरी ठेवावे, यावर सगळ्यांचे एकमत झाले. आजपासून माझा अभ्यास मीच करीन, शहाण्या मुलासारखा वागेन, हे नंदूने कबूल केले. 

दुस-या दिवशी सकाळीच स्वीटीचा फोन आला. "नंद्या, आनंदाची बातमी! आत्या तिच्या गावाला गेली. फ्रूटीला घेऊन माझ्या घरी ये. आपण तिघे मिळून खेळू". 

नंदूचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. आता कुठे फ्रूटी सगळ्यांची आवडती झाली होती आणि स्वीटी तिला परत मागत होती. घरातील सगळ्यांनाच फ्रूटीचा लळा लागला होता. फ्रूटीला परत द्यायला नंदूच्या जिवावर जात होते. नंदू आणि तायडा एकमेकांच्या गळ्यात पडून रडायला लागले. 

आईबाबा आणि आजीने दोघांचीही समजूत घातली. 

आजी म्हणाली, "मित्राने मित्राला मदत करायची असते. अडचणीच्या वेळी फ्रूटीला सांभाळून तू स्वीटीला मदत केली, हे छान झाले. आता ज्याची वस्तू त्याला परत द्यायला हवी". 

काही दिवसांच्या सहवासातून नंदू आणि फ्रूटी यांच्यात निरागस जिव्हाळ्याचं आणि अतूट मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. नंदू नाइलाजाने फ्रूटीला स्वीटीकडे परत द्यायला तयार झाला. आईने फ्रूटीला दूधपोळीचा कुस्करा करून दिला. फ्रूटीच्या गळ्यात घालण्यासाठी छोट्या छोट्या शुभ्र मण्यांची सुंदर माळ बनवली. तायडानं एक छोटंसं घुंगरू आणून फ्रूटीच्या पुढच्या पायात बांधले. फ्रूटी घरभर बागडत होती आणि तिच्या पायातलं घुंगरू छनछन वाजत होतं. नंदूनं रडू आवरलं आणि तिला स्वीटीच्या घरी घेऊन गेला. फ्रूटीला पाहून स्वीटी इतकी आनंदली, की ती तिचे मटामट पापे घेऊ लागली. फ्रूटीशी झालेली ताटातूट ही नंदूसाठी अतिशय दु:खदायक गोष्ट होती. फ्रूटीला परत करून येताना नंदूच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहत होत्या. आज नंदूला जेवण करावेसे वाटत नव्हते. दूध प्यावेसे वाटत नव्हते. सारखी फ्रूटीचीच आठवण येत होती. 

तेवढ्यात दारावरची बेल वाजली. आईने दार उघडताच घुंगराचा आवाज करत फ्रूटी पळतच आत आली. नंदूच्या अंगावर चढून बसली. म्यांऊ म्यांऊ करत नंदूचे गाल चाटायला लागली. पाठोपाठ स्वीटीही घरात आली आणि म्हणाली, "नंद्या, तूच सांभाळ तुझ्या फ्रूटीला. ही माझं काहीही ऐकत नाही, म्हणून मग मीच आले, तिला तुला परत द्यायला". 

त्या दिवसापासून नंदू, स्वीटी आणि फ्रूटी हे तिघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड बनले आहेत. आता नंदूच्या घरात पुन्हा एकदा आनंद ओसंडून वाहतोय आणि घरभर ऐकू येतेय ती फ्रूटीच्या घुंगराची छुनछुन! 

अशी ही आनंदपर्यवसायी गोष्ट आहे. 

लेखिकेने 'फ्रूटी कोणाची?' ह्या प्रश्नाचे उत्तर वाचकांवर सोपविले आहे. 

'फ्रूटी कोणाची?' ह्या बालकादंबरीचे कथानक अतिशय ओघवते, प्रवाही आणि उत्कंठावर्धक आहे. लेखिकेची भाषा अतिशय समृद्ध आहे. ही भाषा अतिशय लालित्यपूर्ण आणि काव्यमय आहे. पात्रांच्या तोंडी आलेले संवाद त्या त्या पात्रांना शोभेसे आहेत. ह्या कथानकातही एक प्रकारचे नाट्य आहे, पण कुठेही कृत्रिमता किंवा नाटकीपणा जाणवत नाही. लेखिका मुळात शिक्षिका असल्यामुळे लेखिकेला बालमानसशास्त्राची चांगली जाण आहे. ह्या कथेतील नंदू, स्वीटी, ओवी, मुकू, नेहा, जॉन, सॅंडी, आदित्य, अथर्व ही सगळी पात्रं बालसुलभ प्रवृत्तीनुसार वागतात. 

स्वीटी आपल्या आवडत्या फ्रूटीला अडचणीच्या प्रसंगी नंदूच्या हाती सोपविते, यातून तिचा मित्रावरचा विश्वास व्यक्त होतो. नंदू घरच्या लोकांना न विचारता फ्रूटीला गुपचूप आपल्या घरी घेऊन येतो, यातून त्याचे मित्रप्रेम आणि प्राणिप्रेम दिसून येते. आजी नंदूला मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देते. नंदूची आई, "नंद्या, असं जेवणाच्या ताटावरून उठून जाऊ नये. अन्नाचा अपमान होतो", अशा शब्दांत नंदूच्या मनावर संस्कारशिल्प कोरण्याचा प्रयत्न करते. नंदू आणि फ्रूटी इतके एकरूप झाले आहेत, की दोघांनाही एकमेकांच्या भावना समजतात. फ्रूटीसाठी इतरांना खोटे बोलतानाही नंदूला त्याचे काहीच वाटत नाही. फ्रूटीच्या तहानभुकेपुढे नंदूला आपली तहानभूक कमी महत्त्वाची वाटते. 

शिंदेकाकूंनी फ्रूटीला दोरीने बांधून ठेवल्याचे पाहून नंदू हळहळतो. ही त्याची संवेदनशीलता आहे. नंदू आपली आवडती फ्रूटी स्वीटीला परत द्यायला तयार होतो, यात त्याचा प्रामाणिकपणा आहे. ज्याचे त्याला परत द्यावे, ही भावना फारच महत्त्वाची आहे. लेखिकेने भागवत सरांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम सांगितले आहेत. दताळे चंदूकाका, चहावाले काका, रस्त्यावरची अवखळ पोरं इ. पात्रांच्या माध्यमातून लेखिकेने विनोदनिर्मितीही केली आहे. फ्रूटी आणि नाग यांची झटापट दाखवून लेखिकेने सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीतील संघर्ष दाखविला आहे. फ्रूटीचा नागावरील विजय दाखवून लेखिकेने 'सत्यमेव जयते'चा संदेश अधोरेखित केला आहे.

 'फ्रूटी माझ्याकडे राहिली काय आणि तुझ्याकडे राहिली काय', ह्या स्वीटीच्या विधानातून तिचा समंजसपणा आणि तिच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो. सुरुवातीला नकोशी असलेल्या फ्रूटीने आपल्या गुणांनी नंदूच्या घरच्या सगळ्यांची मने जिंकली, हा ह्या कथेचा कळसबिंदू आहे. आपण आपल्या गुणांनी आणि कर्तृत्वाने जग जिंकू शकतो, हा संदेश लाखमोलाचा आहे. 

रंजनमूल्य आणि संस्कारमूल्य ह्या दोन्ही गुणांनी युक्त असलेली 'फ्रूटी कोणाची?' ही कलाकृती गुणात्मकदृष्ट्या इतकी सरस आहे, की एक उत्कृष्ट साहित्यकृती वाचल्याचे समाधान मिळते. 

बुद्धभूषण वर्षा लोंढे यांचे मुखपृष्ठ आणि आतील चित्रे अतिशय बोलकी आहेत. इसाप प्रकाशनाचे श्री दत्ता डांगे यांनी केलेली पुस्तकाची अप्रतिम निर्मिती कौतुकास्पद आहे. 

ज्येष्ठ बालसाहित्यकार प्रा. लीला शिंदे यांनी पाठराखणीत म्हटल्याप्रमाणे बालमनाला खिळवून ठेवणारी वर्णनात्मक रंजक शैली, ओघवती भाषा, सुलभ लेखनशैली ही बालवाचकांना आवडेल अशी आहे. 

'फ्रूटी कोणाची?' (बालकादंबरी)

लेखिका : सविता करंजकर जमाले

प्रकाशक : इसाप प्रकाशन, नांदेड.

पृष्ठे ७२ किंमत रु. १५०


sureshsawant2011@yahoo.com

टिप्पण्या