द्वेषाचे वातावरण निवळण्याची गरज गांधीवादी विचारवंत आशा बोथरा यांचे मत


सेलू जि.परभणी : सध्या देशांमध्ये द्वेषाचे दूषित राजकारण आणि त्याला अनुसरून जे एक वातावरण निर्माण झाले आहे. त्याला मिटवून टाकण्यासाठी आणि एकमेकांमध्ये प्रेम आणि सद्भाव वाढविण्यासाठी सर्वांनीच जबाबदारीने प्रयत्नत राहण्याची गरज आहे, असे मत वर्धा येथील सर्व सेवा संघाच्या सेवाग्राम‌ आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष गांधीवादी विचारवंत आशा बोथरा (राजस्थान) यांनी व्यक्त केले. 

आंतरभारती ट्रस्टची भारत दर्शन यात्रा यंदा राजस्थानात आहे.‌ मंगळवारी, १६ मे रोजी जोधपूर येथील युथ हॉस्टेलमध्ये संवाद कार्यक्रम‌ झाला.‌ त्यावेळी आशा बोथरा बोलत होत्या.‌ आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ पांडुरंग नाडकर्णी (गोवा), कार्याध्यक्ष अमर हबीब (अंबाजोगाई), उपाध्यक्ष संगीता देशमुख (वसमत), सचिव डी.एस.कोरे (पुणे), मनीषा आर्य (हैदराबाद) आदींची प्रमुख उपस्थिती होती.

बोथरा म्हणाल्या, आंतर भारतात जर द्वेषात्मक विद्रोह होत असेल, तर हे चिंताजनक चित्र आपल्याला बदलावे लागेल. महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सानेगुरुजींनी आरंभिलेल्या आंतरभारती आणि या सारख्या देशाभरातील सामाजिक संस्था संघटनाना पुढे येऊन त्यासाठी अधिक कार्य करावे लागेल.

बोथरा यांनी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान तसेच मीरा संस्थानच्या कार्याची यावेळी माहिती दिली. ७० वर्षांपूर्वी आईने देशातील पहिल्या महिला सरंपंच म्हणून आगळावेगळा ठसा उमटवला याची आठवण करून दिली संत मीराबाई यांच्या महिला सबलीकरणाच्या ठरलेल्या आदर्श कार्याची ओळख करून दिली. या वेळी बोथारा यांचा सत्कार करण्यात आला.‌ आंतरभारतीच्या पदाधिकाऱ्यांचा चरख्याची प्रतिकृती देऊन बोथरा यांनी स्वागत केले. रोख पाच हजार रुपयाची देणगी आंतरभारती कार्यासाठी दिली. सूत्रसंचालन संगीता देशमुख यांनी केले. या वेळी डॉ.भास्कर पाटील, संजय माचेवार, संजय जिंतूरकर, शिवाजी सूर्यवंशी, आशा हबीब, सुधाकर गौरखेडे, बाबासाहेब हेलसकर, सुरेश अग्रवाल, भास्कर शास्री, कल्पना वानरे, नंदकुमार कुलकर्णी, प्रमोद शातलवार, विश्वनाथ गुडेवार आदींसह आंतरभारती विश्वस्त, सदस्य उपस्थित होते.

 


वर्धा सेवाग्राम‌ आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आशा बोथरा यांनी मंगळवारी जोधपूर (राजस्थान) येथे आंतरभारती पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला.

पूर्ण... बाबासाहेब हेलसकर

टिप्पण्या