मुंबई दि.६ : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ग्रामीण भागातील एनटीसीची बंद फिन्ले मिल आमदार ओमप्रकाश (बच्चू )कडू यांच्या पुढाकाराने चालणार असेल तर निश्चितच हे स्वागतार्ह आहे.मात्र हा निर्णय अन्य एनटीसी गिरण्यांनाही लागू झाला पाहिजे.तेव्हा मुंबईसह उर्वरित सक्षम गिरण्या चालू करा,नाहीतर उपासमारिने होरपळ होत असलेले कामगार टोकाची भूमिका घेतील,असा सावधगिरीचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांनी येथे कामगारांच्या मेळाव्यात बोलताना दिला.
काळाचौकी येथील इंदू मिल क्र.५ मध्ये काल हनुमान जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.त्या औचित्याने कामगारांचा मेळावा पार पडला.त्या वेळी कामगारांपुढे बोलता ना अध्यक्ष आमदार सचिन अहिर पुढे म्हणाले,या गिरण्या बंद होऊन जवळपास तीन वर्षे लोटली.त्या पूर्ववत चालू व्हाव्यात या साठी सघटनेने कधी रस्त्यावर उतरून तर कधी सरकार दरबारी तर कधी न्यायालयाच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.परंतु आता निदान सक्षम गिरण्या तरी आधी सुरू झाल्या पाहिजेत.काही झाले तरी संघटना कामगारांच्या या न्याय हक्कासाठी शेवट पर्यंत नेटाने लढत राहील,असा निर्धारही सचिन अहिर यांनी येथे कामगार मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या भाषणात कामगारांना एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन केले.सर्वश्री खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर बजरंग चव्हाण यांची भाषणे झाली.संघटन सेक्रेटरी मनोहर देसाई यांनी आभार मानले.हनुमान जयंतीचा उत्सव ना.म.जोशी मार्गावरील बंद पोदार मिल मध्येही पार पडला.

COMMENTS