नांदेड: दिनांक २३ मार्च, अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या एन.सी.सी. विभागाच्या वतीने शहीद दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एनसीसी कॅडेटसह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे रक्तदान करुण सहभाग घेतला. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर शिवणीकर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाची नेहमीच एक संस्कारक्षम पिढी बनवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका राहिली आहे असे सांगून फेसबुक व इंस्टाग्राम च्या रिल्स मध्ये आजची तरुणाई व्यस्त झाली आहे या काळात विद्यार्थ्यांनी आपल्यासमोर जे खरे स्टार आहेत, जे खरे नायक आहेत व ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाचे बलिदान दिले त्या महानायकांना आपण आपला आदर्श मानलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा वेळ या रिल्समध्ये वाया न घालता उज्वल भवितव्यासाठी हा मूल्यवान वेळ दिला पाहिजे असा मौलिक सल्ला दिला.
नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे वैशिष्ट्ये म्हणजे थोर क्रांतिकारक वीर भगतसिंग यांच्या मातोश्री श्रीमती विद्यावती देवी यांच्या शुभहस्ते या महाविद्यालयाची पायाभरणी झाली आहे. देशभक्तांचा व क्रांतीकारकांच्या विचाराचा वारसा महाविद्यालय सतत विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करते. याचाच एक भाग म्हणून थोर क्रांतिकारक वीर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू या महान क्रांतिकारकांना रक्तदान शिबिराच्या माध्यमातून श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी २६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रत्येकवर्षी महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. याप्रसंगी एन. सी. सी. विभाग प्रमुख डॉ. किशोर ईंगळे यांनी मार्गदर्शन करत असताना रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या रक्तदान ही काळाची गरज असून सर्वांनी नियमितपणे रक्तदान करून राष्ट्रप्रेमाची भावना जागृत ठेवावी. असे मत विषद केले.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या नवनियुक्त उपप्राचार्य डॉ. सौ. कल्पना कदम मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या रक्तदान शिबिरात रक्त संकलन करण्यासाठी गोळवलकर गुरुजी रक्तपेढीचे अधिकारी बालाजी शिंदे व त्यांचे इतर सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी, प्रा.शालिनी वाकोडकर, डॉ. शशिकांत दरगु, डॉ.संदीप काळे, डॉ. पंकज यादव, श्री संतोष परळीकर व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय छात्र सेना विभागातील व इतर विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री शिवराज सोनटक्के, गोविंद कोलते, श्रीकांत काळे व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS