नांदेड- मराठवाडा- विदर्भाच्या सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदी उन्हाळ्याच्या प्रारंभीच कोरडीठाक पडली असून त्यामुळे मनुष्यासह वन्यप्राण्यांची पाण...
नांदेड- मराठवाडा- विदर्भाच्या सीमेवरुन वाहणारी पैनगंगा नदी उन्हाळ्याच्या प्रारंभीच कोरडीठाक पडली असून त्यामुळे मनुष्यासह वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असून पाण्याच्या दुर्भिक्षामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ईसापूर धरणातून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी नवभारत युवा संघाचे प्रदेशाध्यक्ष तथा समाजभूषण लवकुश जाधव यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगांव, हिमायतनगर, किनवट व माहूर या तालुक्यातून पैनगंगा नदी वाहते. सध्या उन्हाळ्यास प्रारंभ झाला असून, सुरुवातीलाच उन्हाचे चटके बसत असल्यामुळे जंगलातील पाणवठे मार्चमध्येच कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवीवस्तीकडे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सद्यःस्थितीत पैनगंगा नदी कोरडीठाक पडली आहे. पाण्यासाठी या भागातील शेतकर्यांना, नागरिकांना दाही दिशा भटकंती करावी लागत आहे. पैनगंगेत सध्या पाणीच नाही, अशा अवस्थेत वन्य प्राणी कसे जगावेत याची चिंता वन्यप्रेमी नागरिक व्यक्त करीत आहेत. तसेच या नदीपात्रा शेजारील शेतकर्यांनी उन्हाळी पिके घेतली असून नदीला पाणी नसल्यामुळे सदर पिके वाळून जात आहेत. तर हिमायतनगर, हदगांव, किनवट व माहूर तालुक्यातील बहुतांश नदीकाठच्या गावांना या नदीवरुनच पाणी पुरवठा केला जातो. परंतु सध्या नदीपात्रात पाणी नसल्यामुळे या भागातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडावे अशी मागणी समाजभूषण लवकुश जाधव यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासह जलसंपदामंत्री, खा. हेमंत पाटील, आ. माधवराव पाटील जवळगांवकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
.jpg)
COMMENTS