नांदेड, दि.२२ (प्रतिनिधी) ः महाराष्ट्र शासन कृषि विभाग, आत्मा तसेच मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २५ ते २८ मार्च दरम्यान सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत हिंगोली येथील रामलिला मैदानावर मा. बाळासाहेब ठाकरे हळद महोत्सव आणि जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे खासदार हेमंत पाटील यांनी आवाहन केले.
मा. बाळासाहेब ठाकरे (हरिद्रा) हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मा. बाळासाहेब ठाकरे हळद महोत्सव आणि जिल्हा कृषी महोत्सवाच्या अनुशंगाने मंगळवारी (दि.२१) आयोजित केलेल्या बैठकीत माहिती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या बैठकीस कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे, एम. वाय. राजे, प्रशासन अधिकारी एस. बी. बोरा, आर. एम. देशमुख, दिलीप कच्छवे, प्रा. सुरेश कटकमवार, सदाशिव पुंड, श्री. राचेवाड, श्री. भुरेवाड यांच्यासह सेवानिवृत्त अधिकारी व कंत्राटी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या महोत्सवा संदर्भात खासदार हेमंत पाटील यांनी उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले. दरम्यान अधिक माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, हळद उत्पादनात माहिती प्रसार तंत्रज्ञानाचा वापर, हळद काढणी पश्चात हाताळणी प्रक्रिया व मूल्य संवर्धन, हळद विपणन, पॅकींग, लेबलिंग, ब्रँडिंग, सेंद्रिय हळद लागवड, अन्न प्रक्रिया उद्योगांकरिता मार्गदर्शन यासह विविध योजना बाबत मार्गदर्शन हळद तसेच इतर प्रक्रियायुक्त शेतमाल पदार्थांचे प्रदर्शन व विक्री खरेदीदार - विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची त्यांनी माहिती दिली.याशिवाय या महोत्सवात प्रगतशील शेतकऱ्यांचे मनोगत आणि परिसंवाद, कृषि विद्यापीठांचा व संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र सहभाग यंत्र सामुग्री व पिक संरक्षण उपकरणे तसेच अन्न प्रक्रिया करिता आवश्यक मशिनरीचे प्रदर्शन शेतकऱ्यांचे गट व शेतकरी उत्पादक संस्था/ खाजगी कंपन्यांचा सहभाग या महोत्सवात केला जाणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या महोत्सवात सहभागी व्हावे असे खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हा परिसरातील शेतकरी बांधवांना आवाहन केले.

COMMENTS