नांदेड/प्रतिनिधी रोड आणि रस्ते यावर अधिक खर्च करण्यापेक्षा सरकारने शिक्षणासाठी व त्यातील सुविधांसाठी अधिक खर्च केल्यास पुरोगामी महाराष्ट्र...
नांदेड/प्रतिनिधी
रोड आणि रस्ते यावर अधिक खर्च करण्यापेक्षा सरकारने शिक्षणासाठी व त्यातील सुविधांसाठी अधिक खर्च केल्यास पुरोगामी महाराष्ट्राची प्रगती होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
मराठवाड्याचे शिक्षक आ. विक्रम काळे यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून नांदेड जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, व्हीजेएनटी, आदिवासी व ए.सी. आश्रमशाळा, एकूण 601 शाळांना रूपये 1 कोटी 50 लाख 25 हजार किंमतीची 2 लाख 5 हजार पुस्तकाचा वितरण सोहळा पीपल्स कॉलेज येथे दि. 18 मार्च रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चव्हाण बोलत होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम, आ. विक्रम काळे, प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री डी.पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. मोहन हंबर्डे, माजी आ. रोहिदास चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, काँग्रेसच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ. मीनल पाटील खतगावकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, प्रा. डी.बी. जांभरूणकर, संजय शिप्परकर, रिपाइंचे ढगे आदी जणांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, इतर सुविधांबरोबरच शैक्षणिक सुविधा सुधारल्या पाहिजेत. शिक्षणावर अधिक खर्च झाला तर महाराष्ट्र अधिक प्रगतीवर जाईल. वाचन चळवळीसाठी आमदार निधीतून 1 कोटी रूपये देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक नगरपालिकेमध्ये वाचनालय असायला हवे, असे ते म्हणाले. राज्य कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, इतर योजनांवरील खर्च कमी करून जुनी पेन्शन कर्मचार्यांना लागू करावी, लवकर यावर तोडगा काढावा असेही त्यांनी सांगितले.
शिक्षक आ. विक्रम काळे म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये वाचन संस्कृती वाढावी, अभ्यासाबरोबर मुलांना तर पुस्तके वाचालया मिळावी. या हेतूने प्रत्येक शाळेला ग्रंथभेट दिली जाणार आहे. अनुदानित व शासकीय शाळांना ग्रंथभेट दिली जाईल. 1 कोटीहून अधिक रूपयांची पुस्तके उपलब्ध करून दिली जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही, तोपर्यंत आपण पेन्शन घेणार नसल्याचे सांगितले. संच मान्यतेसाठी सरकारने जाचक अटी लावलेल्या आहेत, या अटी शिथील करण्यासाठी लवकरच शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने कर्मचार्यांचा अंत न पाहता त्वरीत जुनी पेन्शन योजना लागू करावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून बोलताना माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम म्हणाले की, आ. विक्रम काळे यांनी शाळेला ग्रंथभेट देण्याचा उपक्रम राबविला आहे. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. यामुळे नक्कीच वाचन संस्कृती वाढून एक निकोप समाज घडविण्यासाठी याची मदत होणार आहे. राज्य कर्मचार्यांना पेन्शन मिळाली पाहिजे, ही भुमिका माझी असली तरी ग्रामीण भागामध्ये शेतमजूर, शेतकरी यांचे उत्पन्न अत्यंत कमी आहे. गरीब माणसांकडे पाहिले पाहिजे, शेतकरी, शेतमजूर यांना पेन्शन मिळायला हवी, असे मतही माजी मंत्री कदम यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास्थास्थळी मान्यवरांच्या हस्ते नांदेड जिल्ह्यातील, तालुक्यातील प्रत्येक शाळेला प्रातनिधीक स्वरूपामध्ये पुस्तक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व उर्वरित पुस्तकांचे वितरण मल्टीपर्पज हायस्कूल येथून शिक्षणाधिकार्यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तसेच राहिलेल्या इतर तालुक्यांतील शाळांचे पुस्तकाचे वाटप शिक्षणाधिकारी नियोजन करून करणार आहेत. आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक व विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
COMMENTS