पुणे येथील स्वाती राजे ह्या पत्रकार आणि लेखिका आहेत. बालकुमारांसाठी त्यांनी विपुल लेखन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बालसाहित्याचा त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्यामुळे 'साधना' साप्ताहिकातील त्यांची जागतिक बालसाहित्याचा आढावा घेणारी लेखमाला वाचकप्रिय ठरली. भाषांचे जतन करणाऱ्या भाषा फाउंडेशन ह्या संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्ष आहेत.
मोठ्या अगत्याने त्यांनी मला त्यांची १)रस्ता,२)पाऊस,३)प्रवास, ४)पूल
५) शोध, ६)फुगा, ७)अंधाराचं गाव आणि
८)न ऐकलेली गोष्ट अशी ८ पुस्तके भेट पाठविली आहेत. पहिली ३ पुस्तके ज्योत्स्ना प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत, तर नंतरची ५ पुस्तके रोहन प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत. यापैकी काही पुस्तके मी यापूर्वी विकत घेऊन वाचली होती.
स्वाती राजे यांची ही ८ पुस्तके म्हणजे बालकुमारांसाठी अक्षरधन आहे! हा अनपेक्षित असा अलभ्य लाभ आहे!
आधी मी 'न ऐकलेली गोष्ट' वाचली.
चिमुरडी चंदा ही ह्या कथेची निष्पाप नायिका आहे. चंदाच्या मनातली गोष्ट करुणेनं भिजलेली आहे. पण चंदाच्या मनातली गोष्ट ऐकायला कोणाकडेच वेळ नाहीये. नाइलाजाने तिला आपल्या मनातली गोष्ट मनातच गाढून टाकावी लागते. परिणामी चंदाच्या अंगणात गोष्टीचं झाड उगवलं. शेवटी लेखिकेने प्रत्येकाच्या दारामध्ये एक गोष्टीचं फुलावं, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. चंदाची अस्वस्थता आणि संवेदनशीलता मनाला फारच भावते! गोष्ट अतिशय ओघवती आहे तितकीच ती तथाकथित मोठ्यांसाठी बोधप्रद आहे!
'पूल' ही अशीच एक झपाटून टाकणारी गोष्ट आहे. ह्या गोष्टीच्या माध्यमातून लेखिकेने बालवाचकांना वेगळ्या प्रदेशात फिरवून आणले आहे. उत्तरेतील लोकजीवनाची आणि लोकसंस्कृतीची ओळख करून दिली आहे. धुवाधार पाऊस, लोहित नदीचा पूर आणि मिरीची असहाय भावावस्था वाचकाला झपाटून टाकते. मुलीला कमी लेखणा-या लोकमानसावर लेखिकेने अचूक बोट ठेवले आहे.
लोहितच्या मोडलेल्या पुलाने तर खरोखर दोन टोकं जोडली होती!
हा गोष्टीचा आनंदपर्यवसायी शेवट सुखावून गेला.
'शोध' ही छोटी गोष्ट मोठी ज्ञानवर्धक आहे. धुळकोबाने घेतलेला खडोबा, दगडोबा, खडकोबा, कडोबा ह्या आपल्या पूर्वजांचा शोध बोधप्रद आहे.
पृथ्वी, आकाशगंगा, ब्रह्मांड ह्या भूगोलातील अवघड संकल्पना अतिशय सोप्या होत जातात .
धरतीने धुळकोबाच्या छोटेपणातील मोठेपणा फारच छान समजावून सांगितला आहे.
बालकांना असे समजावून सांगण्याची, त्यांना त्यांच्या आत्मबलाची जाणीव करून देण्याची गरज असते.
धुळकोबाने गरजेपोटी घेतलेला आत्मशोध फारच प्रेरणादायी आहे.
ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
इटुकली गोष्ट ,पण किती रंजक आणि बोधप्रद आहे!
बालकुमारांचे भावविश्व समृद्ध करणारी 'फुगा' ही गोष्ट फारच ह्रदयस्पर्शी आहे.
फुगेवाल्या मुलाचे आणि सिद्धार्थचे भावविश्व फारच छान चितारले आहे! कथेच्या शेवटी फुग्याविषयी आणि पर्यायाने फुगेवाल्या मुलाविषयीची व्यक्त झालेली सिद्धार्थची संवेदनशीलता लाख मोलाची आहे! मोठ्यांना कचरा वाटणा-या गोष्टी मुलामुलींना फारच मोलाच्या वाटत असतात.
लेखिकेने कमीत कमी शब्दांत 'आहेरे' आणि 'नाहीरे' वर्गातील दरी छान टिपली आहे. संवेदनशीलता हे मूल्य बालवाचकांपर्यंत पोहोचविण्यात लेखिका कमालीची यशस्वी झाली आहे.
'पाऊस' ह्या गोष्टीत जातीयता आणि धर्मांधतेचे छान कान पिळले आहेत.
कथेच्या शेवटी मोठे सगळे खोटे ठरले. त्यांचे खरेखुरे चेहरे उघडे पडले आणि अखेरीस बाळगोपाळांचीच प्रार्थना फळाला आली!
मानवतावादाचा हा पाऊस सुखावून गेला!
'अंधाराचं गाव' ह्या गोष्टीतील साऊ ही सावित्रीबाई फुलेच वाटतात. त्यांनी अंधार भेदला, म्हणून तर आज आयाबहिणींच्या जीवनात प्रकाश पसरला आहे. साऊने काळा काळोख संपवून महिला भगिनींना उजेडाचा तिसरा डोळा दिला. साऊने बायाबापड्यांच्या ह्रदयात अक्षरांचे दिवे पेटविले. शहाणपणाच्या ज्योती पेटविल्या.आता त्यांच्या गळ्यात निळ्या स्वप्नपक्ष्याच्या कंठातली सोनेरी गाणी आहेत.
मिट्ट अंधाराशी लढणाऱ्या सा-या सावित्रीच्या लेकींची ही उजेडाची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे.
'प्रवास' ह्या पुस्तकातील गव्हाच्या बियाचा प्रवास जितका रंजक तितकाच उत्कंठावर्धक आहे! लेखिकेने केलेली निसर्गवर्णने पुस्तकांच्या पानापानांवर जिवंत झाली आहेत.
चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे आणि लेखिकेचे शब्द एकजीव झाले आहेत.
ज्योत्स्ना आणि रोहन प्रकाशनाने जाड आर्ट पेपरवर बहुरंगी छपाई करून पुस्तकाची निर्मिती अतिशय अप्रतिम केली आहे!
'रस्ता' ही गोष्ट मी दोन वेळा वाचली. खूप खूप मज्जा आली. एक वेडं कोकरू कुतूहलापोटी नवीन जग शोधून काढतं. कोकरू चाललेल्या एकाकी वाटेची पुढे वहिवाट होते. त्यातून सडक, हमरस्ता आणि महामार्ग बनत जातो.
कोकराच्या हट्टाचे, जिद्दीचे आणि स्वप्नाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!
अशा उत्सुकतेतून, हट्टांतून आणि जिद्दीतूनच शोध लागतात, हे बाळगोपाळांना कळायला वेळ लागत नाही.
प्रत्येकाच्या मनात एक जिज्ञासू, उत्सुक आणि हट्टी कोकरू दडलेलं असतं, हेही खरंच! लेखिकेने तथाकथित मोठ्यांना छोट्यांच्या मनातील जिज्ञासा मारू नका, असा कानमंत्र दिला आहे.
स्वाती राजे यांची ही आठही पुस्तके कमीत कमी १६ पृष्ठांची आणि जास्तीत जास्त २२ पृष्ठांची आहेत. पुस्तकाचा आकार छोटा असला, तरी परिणामकारकतेचा आवाका खूप मोठा आहे! ह्या प्रत्येक पुस्तकाची भाषा अतिशय ओघवती, लडिवाळ आणि काव्यमय आहे. बालकुमारांशी संवाद साधल्यासारखी.
ह्या ध्येयनिष्ठ लेखनासाठी स्वाती राजे यांचे हार्दिक अभिनंदन!
त्यांची पुढील पुस्तके वाचण्यासाठी बालकुमार वाचक उत्सुक आहेत.
अशी छान छान पुस्तके बालकुमारांच्या हाती दिली, तर त्यांना नक्कीच वाचनाची गोडी लागेल आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत होईल, असे मला वाटते.
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS