मुंबई दि.२६: एकेकाळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बंद गिरण्या एनटीसीद्वारे ताब्यात घेऊन देशभरात हजारो कामगारांना रोजगार दिला.परंतु गेले दोन वर्षे बंद असलेल्या या गिरण्या चालविणे आमचे काम नाही, असे बोलणा-या केंद्र सरकारच्या सार्वजनिक उद्योगाच्या खाजगी करणाच्या धोरणा विरूद्ध आता स्वदेशीचा नारा द्यावा लागेल,असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर यांनी येथे गिरणी कामगारांच्या सभेत बोलताना दिला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने परेल येथील कार्यालयात गुरूवारी अध्यक्ष आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यावेळी गिरण्यांच्या धोकादायक चाळीतील भाडेकरूंच्या प्रश्नावर ते म्हणाले,हा प्रश्न संघटनेने मागील सरकारच्या काळात उचलून धरला होता. पण सरकार बदलले की भूमिका बदलतात.दिल्लीमध्येही वस्त्रोद्योग मंत्र्याची शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले होते.
गेल्या साठ वर्षांत जे घडले नाही ते आता घडत आहे,असे म्हणणा -यांनी महात्मा गांधी,पंडित जवाहरलाल नेहरूं सारख्या अनेक देशभक्तांच्या त्याग आणि निष्ठेतून देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे,हे विसरू नये.ज्या देशात सुई बनत नव्हती आणि जनावरांना खायला देण्यात येणारा सडका घवू आयात होत होता.पण त्याच देशाने काबाडकष्टाच्या जोरावर सर्वच क्षेत्रात स्वयंपूर्णता प्राप्त केली.जगातील नामवंत उद्योग पतींनी येथे उद्योग निर्मितीला पसंती दिली.आपल्या भारत देशाने निर्यातीत मोठीच मजल मारली आहे,एवढेच नव्हे तर उपग्रहाच्या दिशेने क्रांतीकारक पाऊल उचलले,हे प्रगतीचे द्योतक नव्हे काय?असा सवाल करून सचिन अहिर म्हणाले, कोणतेही युद्ध न करता केवळ कठोर संघर्ष करुन स्वातंत्र्य मिळविणारा शूर विरांचा हा देश आहे,ही ख्याती संपूर्ण जगात या देशाने मिळवली आहे.तेव्हा यूवा पिढीने ही यशोगाथा सर्व सामान्यांपर्यंत नेली पाहिजे,असेही सचिन अहिर यांनी आपल्या भाषणात शेवटी सांगितले.सरचिटणीस गोविंदराव मोहिते तसेच अन्य पदाधिकारी त्या वेळी उपस्थित होते.
गं.द.आंबेकर प्रतिष्ठान कॅटरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ध्वजारोहण समारंभात भाग घेतला.उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी सेवादल विभागा च्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.****

COMMENTS