नांदेड : सहयोग सेवाभावी संस्था संचलित इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बी. फार्म. अंतिम वर्ष...
नांदेड : सहयोग सेवाभावी संस्था संचलित इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व बी. फार्म. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. शैक्षणिक यशाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि उच्च शिक्षणाची प्रेरणा देणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पार पडला. महाविद्यालय हे २००९ पासून फार्मसी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून NAAC कडून 'A' श्रेणीने मानांकन प्राप्त आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. नवघरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंत महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक शिवराज बोकडे, माजी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, उपस्थित होते. तसेच प्रवेश विभागाचे संचालक श्री. सुनील कदम, विभागप्रमुख डॉ. एस. बी. जाधव, डॉ. पी. पी. कार्ले, डॉ. पी. ए. कांबळे, श्रीमती भागत, श्रीमती गजाळे, श्री पवन सागरुळे, श्रीमती श्रीकोंडा, श्रीमती लाहोटी तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. बोडके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महापुरुषांचे त्याग, बलिदान, विचार आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान यांचे आत्मचिंतन करण्याचे आवाहन केले. "शिका, स्वतःला सक्षम करा आणि समाजासाठी उपयुक्त ठरा. उच्च शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी करा," असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात विद्यापीठ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे योगदान आणि महाविद्यालयाने दिलेल्या शैक्षणिक वातावरणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मनोगत मांडले. पालकांनीही आपल्या भावना व्यक्त करत महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे व विद्यार्थीकेंद्री उपक्रमांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे एका गुणवंत विद्यार्थिनी आर्या कुलकर्णी यांच्या कुटुंबातील आजोबा, वडील आणि नात अशा तीन पिढ्या एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्या. या दुर्मीळ प्रसंगामुळे कार्यक्रमाला भावनिक आणि प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
याच प्रसंगी बी. फार्म. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि व्यावसायिक नैतिकता जपण्याचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा देत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव माननीय डॉ. संतुकराव हंबर्डे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नवघरे, प्राध्यापक वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक व अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS