पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील थापलिंग खंडोबाची यात्रा ६ व ७ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहाने साजरी झाली. जवळजवळ तीन लाख भावीक या यात्रेला आले होते. कोरोनामुळे गेली दोन वर्ष बैलगाड्यांच्या शर्यती झाल्या नाहीत. परंतु यावर्षी थापलिंगची यात्रा भरगच्च भरल्यामुळे शेकडो बैलगाडे थापलिंगच्या घाटात आले होते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या घाटात इनामाशिवाय देवाच्या नवसासाठी बैलगाडे पळण्यासाठी येतात, थापलिंग यात्रा उत्सव समितीचे प्रमुख देवदत्त निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या यात्रेचे नियोजन केले होते. नवसाला पावणारा खंडोबा असल्याने दरवर्षी या ठिकाणी अनेक भावीक आपले बैलगाडे व बैलगाड्या घेऊन या यात्रेला येतात, थापलींग परिसरातील नागापूर, वळती, थोरांदळे, रांजणी, निरगुडसर, जवळे, खडकी, पिंपळगाव,जाधवाडी, मांजरवाडी या परिसरातील अनेक भाविक मुंबईवरून या यात्रेस आवर्जून येतात. या व्यतिरिक्त यात्रेचे वैशिष्ट्ये म्हणजे थापलिंग गडावर दोन दिवस मोठा महोत्सव असतो.
या महोत्सवात खंडोबाची तळी भरली जाते. या यात्रेत परिसरातील लोक खास जिलेबी भजी खाण्यासाठी कुटुंबासहित हॉटेलमध्ये जातात .या गडावरती शेतकऱ्यांची सर्व अवजारे मिळतात, म्हणून परिसरातील शेतकरी आवर्जून मोठ्या उत्साहाने या यात्रेत येतात. आपली यात्रा कधी येणार अशी दरवर्षी वाट पाहणारे यात्रेकरू यावर्षी मोठ्या संख्येने या यात्रेला आले होते. पौर्णिमा व भरजात्रा अशी दोन दिवस ही यात्रा भरते.

COMMENTS