प्रतिनिधी - महेंद्र पुरी हिंगोली
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीत सेनगाव मार्गावर राहूली बु.पाटीवर एका अज्ञात वाहनाने एका अनोळखी व्यक्तीस जोराची धडक दिली होती.ज्यामध्ये सदर व्यक्तीचा जाग्यावर मृत्यु झाला होता. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघाताचा तपास हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष वाठोरे यांनी गोपनीय पद्धतीने करून अवघ्या चोवीस तासांत मयताची ओळख पटवली व सदर ईसमास धडक देणारे अज्ञात वाहनाचा शोध लावण्यात यश आले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली बळसोंड भागातील पंढरपुर नगर येथील रहिवासी मयत संजय माणिकराव खर्डेकर या व्यक्तीस देव धर्माचे वेड होते दर सोमवारी तो नर्सी येथे नामदेव महाराज यांच्या दर्शनासाठी पैदल जात असे. नर्सी नामदेव येथे दर्शनासाठी जात असताना राहुली बु.पाटीवर सदर ईसमास एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली होती. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी स्थळी धाव घेतली होती. मात्र मयताची ओळख पटत नसल्याने सदर ईसमाचा मृतदेह सरकारी दवाखान्यातील शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. मयत हा अनोळखी व अपघात करणारे वाहन अज्ञात असल्याने पोलिसांपुढे सदर गुन्ह्याच्या तपासाचे मोठे आव्हान होते. यावेळी तपासीक जमादार संतोष वाठोरे यांनी पोलिस अधीक्षक जी श्रीधर, ग्रामीण चे पोलिस निरीक्षक रामकृष्ण मळघणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरवित सायबर सेल ची मदत घेऊन मयताच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या फुटलेल्या मोबाईल वरून मयताची ओळख पटवण्यात जमादार वाठोरे यांना यश आले. मयताच्या नातेवाईक यांचा शोध घेऊन घटनेची माहिती दिली. व ओळख पटल्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर गुप्त माहिती काढून अवघ्या चोवीस तासांत अपघात करणारे वाहनाचा शोध लाऊन वाहन क्रमांक एम एच 01 डिआर 6598 याला ताब्यात घेऊन वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. सदर वाहन हे नोंदणीकृत कामगारांना मध्यान्ह भोजन डबा पोहचविणारे पिक वाहन होते असे समोर आले. मयत आनोळखी व्यक्ती व अज्ञात वाहन दोन्ही चा तपास अवघ्या चोवीस तासात लाऊन उत्कृष्ट कामगिरी करणारे ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक संतोष वाठोरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS