नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आज वाशी येथील विष्णुदास नाट्य सभागृहामध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन संपन्न झाला. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कोविड काळात दोन वर्ष कार्यक्रम झाले नाही, ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने आजच्या पहिल्याच कार्यक्रमाने नवी मुंबईत माझ्या कामकाजाची सुरुवात होत आहे. नवी मुंबई हे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे फार मोठे योगदान आहे. ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणे तसेच त्यांची काळजी घेणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.
नवी मुंबईचे लोकनेते व आमदार गणेश नाईक यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की, नवी मुंबई महानगरपालिका ही विरंगुळा केंद्र असणारी भारतातील पहिली महानगरपालिका आहे. ही पालिका १९९२ ला स्थापन झाली असून, या शहरात २७ विरंगुळा केंद्र आहेत. स्वच्छ शहर ठेवण्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग आहे. ज्येष्ठ नागरिकांना सुखापेक्षा आनंद मिळाला पाहिजे. या शहराच्या विकासासाठी मी लवकरच आयुक्तांना भेटून ज्येष्ठ नागरिकांची कशी काळजी घेता येईल तसेच इतर विकासाची कामे याबाबत कल्पना दिली जाईल. आमदार मंदाताई मात्रे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की, नेरूळ येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सुख सुविधासाठी जेष्ठ नागरिक भवन उभे राहत आहे. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना राबविल्या जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी मुंबईत चांगले कार्य चालू आहे. नवी मुंबईसाठी प्रकल्पग्रस्तांनी आपल्या जमिनी दिल्या, त्यांच्या काही रास्त मागण्या आहेत, त्या मान्य होणे गरजेचे आहे. नवी मुंबईत माफियांचा सुळसुळाट झाला असून, घर घेताना आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आमदार रमेश पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्र सरकारतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे, बस, एसटी प्रवासामध्ये अनेक सवलती मिळतात त्याचप्रमाणे श्रावण बाळ योजना व अटल योजना आहेत. नवी मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगले विरंगुळा केंद्र चालविले जाते. महानगरपालिका आयुक्तांनी आदेश काढून भारत व राज्य सरकारच्या योजनांची ज्येष्ठ नागरिकांसाठी अंमलबजावणी करावी. प्रास्ताविक भाषण दादासाहेब चाबुकस्वार यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, संजय देसाई, सुजाता ढोले आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी काव्यवाचन, एकांकिका, कथाकथन, कॅरम, बुद्धिबळ, गायन, नाट्य, निबंध, ब्रिच अशा अनेक स्पर्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक फेडरेशनचे सेक्रेटरी सुरेश पोटे यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नाष्टा व शेवटी स्नेहभोजन होते.
आपला
मारूती विश्वासराव


COMMENTS