नांदेड. (विशेष प्रतिनिधी) नवीन नांदेडातील रहिवासी तथा कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ लिपिक संभाजी जळबाजी कांबळे हे ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. यानिमित्त त्यांचा समता विद्यालयाच्या वतीने सपत्नीक सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला.
उस्माननगर येथील समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ३० सप्टेंबर रोजी संभाजीराव कांबळे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पार पडलेल्या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचालक श्यामराव जहागीरदार गुरूजी यांची उपस्थिती होती. यावेळी विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सचिव बा. दे. कुलकर्णी गुरूजी, कोषाध्यक्ष अनिरुद्ध सिरसाळकर गुरुजी, प्रदीप देशमुख, व्ही. डी. पांडागळे, प्रा. बी. व्ही. रामशेट्टे, डी. एम. तारू व ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे तसेच त्यांच्या अन्य सर्व सहकारी पदाधिकारी,पत्रकार बांधवांची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती.
दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते लिपिक संभाजी कांबळे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य गोविंद बोदेमवाड, प्रा. एस. एस. कटकमवार तसेच सेवानिवृत्त प्राचार्य बी. जी. कांबळे यांनी सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक तथा दैनिक वृत्तरत्न सम्राटचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी संभाजीराव कांबळे यांच्या शैक्षणिक तथा सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन एन. एन. लोंढे यांनी केले, तर समता विद्यालयाचे पर्यवेक्षक राजीव अंबेकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसह शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

COMMENTS