मुंबई दि.१८:एखादी सामाजिक संस्था आपल्या कार्याची जेव्हा
७५ वर्षे पूर्ण करते, तेव्हा तिच्या उन्नतीसाठी आणि उत्कर्षासाठी कार्यकर्त्यांनी निष्ठा, समर्पित भावनेने केलेले कार्य निश्चितच आदर्शवत ठरते,असे गौरवोद्गार परळ येथील शिवसेनेचे कार्यकुशल विभागीय आमदार अजय चौधरी यांनी येथे काढले.
परळ येथील सरकारमान्य आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाचा अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळा स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी दिनी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.परळ गावातील डॉ.एन.के.नायक चौकात पार पडलेल्या या सोहळ्याला आमदारअजय चौधरी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी आर.एम.भट हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे होते.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.
मंडळाचे ८० वर्षावरील जिद्द, चिकाटीने कार्य पुढे नेणारे प्रमुख कार्यवाह विजय परदेशी आणि त्यांना हिरीरीने साथ देणारे साठी-सत्तरी सरलेल्या अन्य कसबी पदाधिकाऱ्यांचा गुणगौरव करताना आमदार अजय चौधरी म्हणाले, काळावेळाचे भान न ठेवता निस्वार्थपणे सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात रचनात्मक कार्य उभे केले,त्याला भविष्यात तोड नाही.त्यांनी सामाजिकार्यातून लोकमानसात मानाचे स्थान संपादन केले आहे,असेही आमदार अजय चौधरी आपल्या भाषणात म्हणाले.या प्रसंगी त्यांच्या हस्ते विभागातील ७५ वर्षे वयाच्या जवळपास ९० वरिष्ठ नागरिकांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन गुणगौरव करण्यात आला.तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नवा उन्माद ओसंडून वहातांना अनेकांना दिसून आला.देशाच्या स्वातंत्र्याचा आणि आझाद हिंद सर्वोत्कर्ष मंडळाचा अमृतमहोत्सव एकत्रित संपन्न होत होता,याचा अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणात गुणगौरव केला.या वेळी परळगावात प्रत्येक बिल्डिंग आणि नाक्या-नाक्यावर बॅनर,तिरंगी झेंडे लावून तिरंगीमयी वातावरण निर्माण करण्यात आले होते.
माणूस मोठा पदाने नव्हे तर कर्तृत्वामुळे होतो,असे त्या वेळी माजी मुख्याध्यापक शिवाजी कांबळे म्हणाले.
या प्रसंगी एकेकाळी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणा-या परळगावातील नाट्य कलाकार विमल म्हात्रे व प्रताप आयरे, कबड्डीतील कसबी खेळाडू शरद गोळवलकर,कथा लेखनात नावाजले लेखक काशिनाथ माटल, सामाजिक कार्यकर्ते कृष्णकांत पालकर आदींचा ह्रद्य सत्कार करण्यात आला.विभागातील ९४ वर्षाच्या महिला रमाबाई संजीव भट यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संस्थेने नवा पायंडा पाडला हे विशेष!***

COMMENTS