सेलू : येथील उपविभागीय कार्यालय, नगर परिषद व गट शिक्षणाधिकारी कार्यालयालच्या संयुक्त विद्यमाने ०९ ते १७ ऑगस्ट दरम्यान आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला ' स्वराज्य महोत्सव ' सेलूकरांचा सुसंस्कृतपणा आणि सहकार्याने यशस्वी झाला. अशी भावना कार्यक्रमाच्या अध्यक्ष उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांनी व्यक्त केली. त्या नूतन महाविद्यालयाच्या कै. पं.या. तरफदार सभागृहात आयोजित स्वराज्य महोत्सवातंर्गत संपन्न झालेल्या स्पर्धा, उपक्रमांच्या बक्षीस, प्रमाणपत्र वितरण समारंभात बुधवार ( दि. १७ ) रोजी अध्यक्षिय समारोप करताना बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार दिनेश झांपले , मुख्याधिकारी देवीदास जाधव, गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार आपल्या भाषणात म्हणाल्या की, ' सेलूला सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे येथील सर्व उपक्रम हे लक्षवेधी असतात. शहरातील सर्व शिक्षण संस्था, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, सामाजिक संघटना, नगरपरिषद, शिक्षण विभाग आणि समस्त सेलूकरांची एकजूट यामुळे सर्व स्पर्धा, उपक्रम यशस्वी झाले. ' आजादी का अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पहिला गट ०५ वी ते ०८ वी, दुसरा ०९ वी ते १० वी गटात तालुकास्तरीय वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, समुह नृत्य, समुह व वैयक्तिक गीत गायन, अभिरूप वेशभूषा, सामुहिक राष्ट्रगीत गायन, खाद्य पदार्थ सजावट या सर्व स्पर्धा, उपक्रमात यशस्वी विद्यार्थी, या स्पर्धांचे संयोजक, परीक्षक यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत यांनी केले. सुत्रसंचलन सुरेश हिवाळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुनीता काळे, प्रा. नागेश कान्हेकर, गणेश माळवे, किशोर कटारे, भालचंद्र गांजापुरकर, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS