लातूर / लातूरसह इतर दोन जिल्ह्यात मांजरा, तेरणा नदीवरील बॅरेजेसवर जवळपास १५ वर्षांपासून काम करणार्या कामगारांना सुरक्षा, वेतनहमी याबरोबरच अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी सोमवार २८ मार्चपासून प्राधिकरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु करताच लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने तत्काळ दखल घेत मागण्यांची पुर्तता करण्याबाबत संबंधित विभागास दिलेल्या सूचनांचे लेखी आश्वासन दिल्याने सदर उपोषण स्थगित करण्यात आले आहे.
कामगारांना कामाचे तास ठरवून द्यावे, वेतनपत्रक वाटपाचे रजिस्टरवर स्वाक्षरी घेण्यात याव्यात, कोणत्याही सुरक्षा हमी शिवाय पुराच्या पाण्यात उतरवू नये, कामाप्रमाणे हुद्दा आणि त्यानुसार वेतन देण्यात यावे, इ, पी, एफ कपात करण्यात यावे, वेतन दरमहा मिळावे, प्रकल्प स्थळावर निवारा, लाईट व इतर सुरक्षेच्या सोयी उपलब्ध करून देण्यात यावे, कामगारांना किमान वेतन नियमानुसार वेतन मिळावे, प्रकल्पाशिवाय वसुली, जमीन मोजणीसारखे इतर कामे कामगारांना लावण्यात येऊ नये, कामगारांना गणवेश, बॅटरी, सुरक्षा बूट आदी साहित्य मिळाले पाहिजे, कामगारांना मिळणार्या वेतनाची नोंद असावी यासह अन्य मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी कामगार मागील १५ वर्षापासून प्रशासनाकडे विविध लोकशाही मार्गाने मागणी करत आहेत परंतु याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष संबंधित विभाग देत नसल्याने या भूमिकेचा निषेध नोंदवत कामगारांनी लाभ क्षेत्राच्या प्राधिकरण कार्यालयासमोर सोमवार २८ मार्च रोजी बेमुदत उपोषण सुरु केले होते.याची तत्काळ दखल घेत संबंधित कार्यकारी अभियंता, कंत्राटदार यांना मंडल कार्यालयात बोलावून कामगारांच्या मागण्याबाबत चर्चा करत कंत्राटदारास सूचना करत उपोषण मागे घेण्या संदर्भात विनंती करुन महाराष्ट्र राज्य रस्ते व पाटबंधारे कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव कॉ.राजेंद्र विहिरे यांना लेखी आश्वासन दिले. यावेळी लातूर जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे,गणेश सोनटक्के,बालाजी बिराजदार, विनोद मोगरगे, देवानंद अडसूळ, मेघराज कांबळे, दौलत कराड, महावीर पाटील यांची उपस्थिती होती.

COMMENTS