नांदेड.(विशेष प्रतिनिधी) भोकरफाटा येथून आणलेली खिचडी का खाल्ली, असे विचारल्याचा राग धरून लाथा-बुक्यांनी पोटात तसेच छातीत गंभीर मारहाण करून २५ वर्षीय तरूणाचा खून केल्याच्या आरोपाआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ते लातूर रस्त्यावरील शासकीय दूध डेअरी चौकाजवळील विणकर कॉलनी,धनेगाव (ता. जि.नांदेड) येथील योगेश गिरी हे २८ मार्च रोजी त्यांच्या गल्लीतील शिवलिंग गायंकी याच्यासोबत येळेगाव साखर कारखाना येथे पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामावर गेले होते. तदनंतर योगेश सायंकाळी साडेपाच वाजेच्यादरम्यान, कामावरून घरी परत आला. थोडा वेळ आराम करून फ्रेश होवून सायंकाळी सहा वाजेचे सुमारास त्याच्या आईला मी 'भोकर' फाटा येथून खिचडी घेतली होती. 'ती' शिवलिंग गायंकी यांच्याकडे आहे. 'ति' घेवून येतो, म्हणून गेला. दहा ते पंधरा मिनिटातच तो परत आला व आईला म्हणाला की, मी आणलेली खिचडी शिवलिंग गायंकीच्या मुलानी खावून टाकली. दरम्यान, त्याने घरी बसून चहा घेतला व पुन्हा शिवलिंग गायंकी यांच्याच घराकडे गेला. त्यानंतर थोड्यावेळात म्हणजेच सायंकाळी साडे सहादरम्यान, मुलगा योगेश ओरडल्याचा आवाज आल्याने आई शोभाबाई गिरी व आत्या सुमनबाई गिरी या दोघीही तिकडे गेल्या असता, योगेश यास शिवलिंग हा शिवीगाळ करत थापड-बुक्यांनी मारहाण करीत होता. तेवढ्यात तेथे शिवलिंग गायंकी याचा मुलगा प्रियदर्शन गायंकी हा आला. त्यावेळी, शिवलिंग याने मुलगा योगेश याला पकडले आणि प्रियदर्शन गायंकी याने त्यास लाथा-बुक्यानी छातीत व पोटावर जबर मारहाण करू लागला. त्यावेळी आपण व ननंद सुमनबाई गिरी सोडवा-सोडवी करत असताना प्रियदर्शन हा त्यास मारहाण करीत होता. तेव्हा मुलगा खाली पडला. त्यानंतर ते दोघेही निघून गेले, असा आरोप मयत योगेश यांची आई शोभाबाई विलास गिरी यांनी दिलेल्या तक्रारीमध्येच नमूद असल्याची माहीती पोउपनि. माणिकराव हंबर्डे तसेच पोलीस नाईक विनोद मामुलवार यांनी दिली.
दरम्यान, नातेवाईकांनी योगेश गिरी यांना विष्णूपुरी, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घेवून गेले. मात्र तेथे डॉक्टरांनी योगेश गिरी यांचा रूग्णालयात येण्यापुर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले, अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सहायक पोउपनि. ज्ञानोबा गिते व मदतनीस पो.कॉ. जुबेर चाऊस यांनी दिली.
एकुणच, माझी खिचडी का खाल्ली, असे विचारल्याचा राग मनात धरून आरोपींनी संगनमताने योगेशला जिवे मारण्याच्या उद्देशानेच त्याच्या पोटात तसेच छातीत लाथा-बुक्यानी गंभीर मारहाण करून त्याचा खून केला,असा आरोप मयत योगेश गिरीची आई शोभाबाई विलास गिरी यांनी 'ग्रामीण' ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला आहे.
याप्रकरणी शोभाबाई विलास गिरी यांनी दिलेल्या तक्रारीच्याआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ३० मार्च रोजी रात्री आरोपींविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, डीवायएसपी डॉ.सिध्देश्वर भोरे आणि प्रभारी ठाणे प्रमुख तथा सहाय्यक पो. नि. सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. माणिक हंबर्डे व त्यांचे सहकारी- पोलीस कर्मचाऱ्यांनी याप्रकरणातील दोन आरोपींना अटक केली.
COMMENTS