नांदेड.(विशेष प्रतिनिधी) नांदेडच्या जुना कौठा परिसरातील १९ वर्षीय तरूणीच्या नावाने 'आयडी' असलेल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर विविध नावाचे बनावट 'आयडी' बनवून त्याद्वारे तिची बदनामी करणाऱ्या अज्ञात आरोपीविरूध्द अखेर नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण ठाण्यांतर्गत असलेल्या जुना कौठा, नांदेड येथील १९ वर्षीय तरूणीच्या नावाने असलेल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर 'अज्ञात' आरोपीने सात ते आठ नावाच्या आयडीवरून तिला नको असलेली मैत्री करून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. अज्ञात आरोपी हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ३ जून २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत बनावट 'आयडी' बनवून 'ति'ला अश्लिल मैसेज केले. याशिवाय, त्याने तिचा फोटो स्टेटसला ठेवून त्यावर अश्लिल शब्दांमध्ये मजकूर लिहून त्या तरूणीची बदनामी केली आहे. त्याचवेळी, त्याने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर सात ते आठ वेगवेगळ्या बनावट आयडी तयार करून आपली बदनामी करून त्रास दिला, असा आरोप पीडित तरूणीने दिलेल्या तक्रारीत नमूद असल्याचीही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
याप्रकरणी संबंधित तरूणीने अखेर १७ ऑक्टोबर रोजी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड व पो. ना. ज्ञानोबा कवठेकर तसेच त्यांचे अन्य सहकारी कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेमुळे उपरोल्लेखित परिसरातील उच्च माध्यमिक विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरूणींमध्ये दहशत पसरली आहे.
COMMENTS