नायगांव / प्रतिनिधी
( रामप्रसाद चन्नावार )
सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अर्ज एका उसाच्या शेतात फेकून दिले असल्याचा धक्कादायक प्रकार नायगांव तालुक्यातील अंतरगाव येथे उघडकीस आला आहे. पिक विमा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार घडला असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला असून,याबाबत येथील शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नायगांव तालुक्यातील अंतरगाव, बरबडा,पाटोदा,मनुर,
वजिरगाव याठिकाणी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांचे तक्रारी अर्ज भरून घेण्यात आले होते.यासाठी सदर प्रतिनिधींकडून बऱ्याच शेतकऱ्याची आर्थिक लूटही सुरूच होती.दरम्यान अंतरगाव येथे ही पंचनाम्याची अशीच प्रक्रिया सुरू होती.उसनवारी करून आधीच आर्थिक अडचणीत असतांना विमा प्रतिनिधीने केलेल्या पैशाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी जमेल तशी पैशांची जुळवाजुळव करून आपल्या नुकसानीच्या तक्रारीचे अर्ज विमा कंपनीकडे व्यवस्थितरीत्या जातील अशी अपेक्षा हा शेतकरी बाळगुन होता.परंतु मंगळवारी सकाळी उसाच्या शेतात काम करतांना गावातील किशनराव शिंदे या शेतकऱ्याला नुकसानीच्या तक्रारी अर्जाचा एक गठ्ठ्ाच आढळून आल्याने धक्काच बसला.या गठ्यात शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनीकडे केलेले तक्रारी अर्ज, विमा भरलेल्या पावत्या यासह इतर कागदपत्र ही आढळून आली. त्यांनी ताबडतोब ग्रामपंचायतीला याबाबत माहिती दिल्यावर गावातील इतर शेतकरी एकत्र येऊन संबंधित प्रतिनिधीला याबाबत फोनवर विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.त्यांनी दिलेल्या उत्तराने एकही शेतकरी समाधान झाला नाही.पीकविमा कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे अक्षिक्षित व्यक्तीकडून पंचनामे करण्यात आले असून,त्यांच्या या बालिशपणा मुळे जर आम्ही विम्यापासून वंचित राहिलो तर याला विमा कंपनी जबाबदार राहील असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.विमा कंपनीच्या या गैरकारभारा बाबत या भागातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याविरोधात चौकशी करून दोषी आढळलेल्या वर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किसान युवा क्रांती संघटनेचे संभाजी पा.शिंदे यांनी दिला आहे.यावेळी उपसरपंच गजानन तोडे,बालाजी शिंदे,किशन शिंदे,श्यामराव तोडे,रावसाहेब शिंदे,सुभाष शिंदे,भागवत शिंदे,मारोती तोडे,तिरुपती शिंदे यांच्यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.
--------------------------
राखी पौर्णिमेला माझ्या मुलीला ओवाळणी आलेली होती.तिने ती तशीच जमा करून ठेवली होती.विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पैशाची मागणी केल्याने मी माझ्या मुलीला अडचण आहे म्हणून मागून घेतले आणि त्यांना दिले.आता विमा मंजूर होऊन काही पैसे पदरात पडतील अशी आशा असतांना सापडलेले हे अर्ज पाहून मला धक्काच बसला.आता आमची कोणी दखल घेणार की नाही अशी भावनिक प्रतिक्रिया घडलेल्या प्रकाराबाबत येथील माधव शिंदे या शेतकऱ्यांनी दिली.
COMMENTS