नांदेड.(प्रतिनिधी) अज्ञात वाहनाच्या जबर धडकेने गंभीर जखमी होवून रस्ता ओलांडणाऱ्या एका २० वर्षीय तरूणाचा जागीच करूण अंत झाला आहे. ही घटना ७ ऑगस्ट रोजी काकांडी शिवारातील नांदेड ते हैद्राबाद महामार्गावरील युवा मिल्ट्री अकॅडमीचे वसतिगृहासमोर घडली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेगाव धानोरा (ता. पुर्णा जि. परभणी) येथील रहिवासी सखाराम अच्युत सोनुले या नावाचा तरूण ७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याचेदरम्यान, काकांडी शिवारातील 'युवा' मिल्ट्री अकॅडमीच्या ग्राऊंडवरून वसतिगृहाकडे येत होता. दरम्यान, नांदेडकडून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून नांदेड ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील काकांडी शिवारातील युवा मिल्ट्री अकॅडमीचे ग्राऊंडकडून वसतिगृहाकडे जाणाऱ्या सखाराम सोनुले यांना रस्ता ओलांडतेवेळी जबर धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सखाराम सोनुले यांचा जागीच करूण अंत झाला आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
याप्रकरणी अच्युत निवृत्तीराव सोनुले यांनी दिलेल्या तक्रारीआधारे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी वाहन चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. उत्तम बुक्तरे आणि त्यांचे अन्य सहकारी पोलीस कर्मचारी हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

COMMENTS