नांदेड.(प्रतिनिधी) नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने दोन चार चाकी वाहनांमधील ४० किलो गांजासह १२ लक्ष रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही घटना २३ जुलै रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेचेदरम्यान, नांदेडच्या 'एमआयडीसी' परिक्षेत्रांतर्गत असलेल्या कृषी उद्योग केंद्रासमोर म्हणजेच खत कारखान्यासमोर घडली.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील 'डीबी' अर्थात गुन्हे शोध पथकाला २३ जुलै रोजी दुपारी दोन चारचाकी वाहनांमधून गांजाची चोरटी वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. नायगावकडून दोन महागड्या चारचाकी वाहनामधून तब्बल ३५ ते ४० किलो गांजा नांदेडकडे येत असल्याचे समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, 'डीबी' तथा गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोउपनि. शेख असद, पोलीस नाईक अनुक्रमे- श्याम नागरगोजे, प्रमोद कऱ्हाळे, संतोष जाधव, ज्ञानोबा कवठेकर, पो. कॉ. शिवाजी पाटील, चंद्रकांत स्वामी, नामदेव मोरे, विश्वनाथ पवार व शिवानंद कानगुले हे चंदासिंग कॉर्नरकडे रवाना झाले. दरम्यान, नायगावकडून गांजाची वाहतूक करीत नांदेडकडे आलेल्या पांढरी, काळी दोन संशयित कार चंदासिंघ कॉर्नरकडून ढवळे कॉर्नरकडे येत होत्या. त्याचवेळी, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोउपनि. शेख असद व त्यांच्या उपरोल्लेखित सहकारी कर्मचाऱ्यांनी नांदेडच्या 'एमआयडीसी' परिसरातील कृषी उद्योग केंद्रासमोर एमएच-१२, सीआर-९१५४ व एमएच-३७, टी-१३१५ या दोन्ही कार थांबवून तपासणी केली. तपासणीदरम्यान, एका कारमध्ये आरोपी- अब्दुल रफीक अब्दुल मुबीन, जान महम्मद खान आयुबखान (दोघेही रा. कारंजा लाड, जि. वाशीम), शेख मुद्दसिर शेख इसाक (रा. नई आबादी, शिवाजी नगर, नांदेड) शेख उस्मान शेख मौला (रा. नंदीपेठ, नांदेड) हे चौघेजण आढळून आले. त्यांचे कारच्या डीक्कीची पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात एका पांढऱ्या पोत्यात प्रत्येकी दोन किलो वजनाचे २० पॉकेट असा एकूण अंदाजे ४ लक्ष रूपयांचा ४० किलो वजनाचा गांजा आढळून आला आहे.
दरम्यान, अन्य दुसऱ्या कारमध्ये उपरोल्लेखित चार आरोपींचे साथीदार इम्रानखान उक्काउल्लाखान, शेख मोहसीन अब्दुल रशिद व अन्य एक विधीसंघर्षग्रस्त बालक (सर्व रा. कारंजा लाड जि.वाशीम) हे तिघेजण आढळून आले आहेत. या कारवाई दरम्यान, पोलिसांनी उपरोक्त आरोपींच्या ताब्यातील दोन चार चाकी वाहन, तब्बल ४० किलो गांजा व रोख ७४ हजार ९०० रूपयांसह एकूण सुमारे तब्बल १२ लक्ष रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. प्रस्तुत कारवाई डीवायएसपी. डॉ. सिध्देश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड, पोउपनि.शेख असद व त्यांच्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे नांदेड आणि शेजारील जिल्ह्यात गांजाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पोउपनि. गोविंद खैरे व पो. कॉ. शेख उमर हे याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. विशेष बाब म्हणजे, नांदेड ग्रामीण पोलिसांच्या उपरोल्लेखित उत्तम कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे तसेच विजय कबाडे यांचेसह उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांनी समाधान व्यक्त करून गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS