नांदेड. (प्रतिनिधी) नांदेड तालुक्यातील बळीरामपूर ग्राम पंचायत हद्दीअंतर्गत
असलेल्या हिम्मतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यासाठी प्रशासनाला यश मिळाले आहे. ही प्रक्रिया ६ जून रोजी सकाळी साडेनऊ ते दहावाजेच्यादरम्यान, पार पडली आहे.
नवीन नांदेड भागातील बळीरामपूर ग्राम पंचायत हद्दीतील हिम्मतपूर येथील एका अल्पवयीन मुलीचा सहा जून रोजी नांदेड शहरातील एका मुलासोबत बालविवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास मिळाली. उपरोल्लेखित माहिती समजताच जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी संदीप फुले यांनी नांदेड ग्रामीण ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्याशी संपर्क साधून पोलीस सरंक्षण देण्याची विनंती केली. त्याचवेळी, प्रभारी पो. नि. घोरबांड यांनी त्वरित प्रतिसाद देत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना अल्पवयीन मुलीच्या घरी भेट देण्याचे आदेश दिले. प्रभारी पो. नि. घोरबांड यांंचा आदेश मिळताच सपोनि. थोरात हे त्यांच्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांसह तात्काळ अल्पवयीन मुलीच्या घरी भेट दिली. गृहभेटीसाठी, सहाय्यक पो. नि. सुरेश थोरात यांचेसोबत जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सरंक्षण अधिकारी संदीप फुले, मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर, वसरणी सज्जाचे तलाठी प्रदीप उबाळे पाटील, नांदेडच्या 'चाईल्ड' लाईनकडून बालाजी आलेवार, मनोज बसवंते, नामदेव लांडगे व जयश्री दुधाटे आले होते. दरम्यान, संरक्षण अधिकारी संदीप फुले यांनी अल्पवयीन मुलीच्या पालकांसह वर मुलास व त्याच्या नातेवाईकांनाही बालविवाह प्रतिबंधक अधिनियम-२००६ विषयी माहिती दिली. याशिवाय, या कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद असल्याचे सांगून, मुला-मुलीचे विवाह योग्य वय (मुलीचे १८ वर्षे पूर्ण, व मुलाचे २१ वर्षे पूर्ण) असायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.
दरम्यान, प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांनी, बालविवाह हा एक प्रकारचा गुन्हा आहे. समाजात अशाप्रकारचे गुन्हे घडू नयेत, यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन केले. त्याचवेळी, सपोनि. सुरेश थोरात यांनी, बालविवाह थांबविण्यापेक्षा नागरिकांनी बालविवाहासाठी जागरूक राहून बालविवाह होणारच नाहीत, यासाठी सर्वांनी नेहमीच दक्षता घेतली पाहिजे, असे याप्रसंगी आवर्जून सांगितले.
COMMENTS