पालकमंत्री अशोकराव चव्हाण आणि आ. मोहनराव हंबर्डे यांच्या
उपस्थितीत मुंबई येथे 'सिडको'च्या अधिकाऱ्यांसोबत झाली बैठक
नांदेड. (प्रतिनिधी) नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत 'मुळ' घरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया लवकरच मार्गी लावण्यात येणार असून, याप्रश्नासंदर्भात मुंबई येथे ९ जून रोजी 'सिडको'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण व नांदेड दक्षिणचे आ. मोहनराव हंबर्डे यांची महत्वपूर्ण बैठक झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
नवीन नांदेड परिसरातील 'सिडको' वसाहतीचेअंतर्गत असलेल्या योजना क्रंमाक १ ते ४ मधील बहुसंख्य घरधारक हे गेल्या अनेक वर्षापूर्वी 'सिडको'तील 'मुळ'घरधारकांकडून 'बॉन्ड' पेपरच्या आधारे अर्थातच मुद्रांकाआधारे घरे खरेदी केलेली आहेत. अनेकांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी घरे घेतलेली असल्याने ही घरे 'मुळ'घरधारकांच्या अनुपस्थितीत व बॉण्ड पेपरचेआधारे घरे हस्तांतरीत करण्याची मागणी करण्यात येत होत होती.
विशेष म्हणजे, यापूर्वी म्हणजेच २००५ मध्ये सिडको प्रशासनाच्या वतीने 'मुळ' घरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया अर्थातच योजना काही दिवसांकरिता कार्यान्वित करण्यात आली होती. दरम्यान, या योजनेचा काहीजणांना लाभ झाला आहे. मात्र, ही योजना फक्त काही दिवसांसाठी मर्यादित होती. परिणामी, त्यावेळी आर्थिक अडचणीत असलेल्या बहुसंख्य घर धारकांना या योजनेचा लाभ घेणेही शक्य झाले नाही. तदनंतर अनेक घरधारकांनी तसेच विविध राजकीय पक्षाचे तथा सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपरोल्लेखित योजना पुन्हा चालू करण्यासाठी प्रयत्न केले. याशिवाय, ही योजना पुन्हा एकदा सुरु करण्यात यावी म्हणून विविध प्रकारचे आंदोलने केली.मात्र, 'सिडको' प्रशासनाच्या वतीने बहुसंख्य घरधारकांच्या उपरोक्त मागणीला प्रतिसाद मिळाला नाही.
दरम्यान, नांदेड (दक्षिणचे) आ. मोहनराव हंबर्डे यांनी नवीन नांदेड परिसरातील सिडको वसाहतीतील उपरोल्लेखित १ ते ४ योजनेतील बहुतांश घरधारकांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व प्रलंबित असलेल्या मागणीकडे विशेष लक्ष घातले. आ. हंबर्डे हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ''सिडको''वासियांचा जिव्हाळयाचा प्रश्न सोडवण्यासाठी औरंगाबाद येथील 'सिडको'चे प्रशासक तसेच नांदेड येथील 'सिडको'चे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला.
यासंदर्भात नांदेड येथील 'सिडको'चे प्रशासक गायकवाड यांच्याशी बुधवारी रात्री संपर्क साधला असता, त्यांनी, 'सिडको' वसाहतीतील मुळघरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरणाच्या योजनेसंदर्भात ९ जून रोजी मुंबईत 'सिडको' प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री अशोकराव चव्हाण, आ. मोहनराव हंबर्डे, नगरविकास मंत्री तनपुरे व आ. बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये महत्वपूर्ण बैठक झाली असल्याचे सांगितले. मुंबई येथील बैठकीस नगरविकास सचिव भूषण गगराणी, 'सिडको'चे मुख्य प्रशासक व सह व्यवस्थापकीय संचालक एस. एस. पाटील, नांदेड येथील 'सिडको'चे प्रशासक भुजंगराव गायकवाड, विकास अधिकारी कपिल राजपूत व त्यांच्या सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
एकूणच, मुंबई येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मुळघरधारकांच्या अनुपस्थितीत घरे हस्तांतरण करण्याची योजना विचाराधीन असून, याविषयी पुढच्या महिन्यात सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपरोल्लेखित योजनेसंदर्भात ठराव पास करून रितसर आदेश जारी करण्यात येईल, त्यानंतरच ही योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती नांदेड येथील 'सिडको'चे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांनी
दिली.

COMMENTS