नांदेड.(विशेष प्रतिनिधी) तक्रारदार यांच्याविरूध्द कंधार ठाण्यात आलेल्या अर्जावरून कोणतीही कारवाई न करण्यासाठी खाजगी इसमामार्फत पाच हजार रूपयांची लाच स्विकारणारा सपोउपनि. सुभाष चोपडे हा अखेर 'एसीबी'च्या जाळ्यात अडकला आहे. ही घटना नऊ जून रोजी संध्याकाळी कुरूळा येथील पूजा हॉटेलमध्ये घडली.
कंधार तालुक्यातील कुरूळा येथील एका ३० वर्षीय तरूणाविरूध्द कंधार पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज आला. या तक्रारी अर्जाआधारे प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदार यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्यासाठी कंधार पोलीस ठाण्यातील 'एएसआय' तथा सहायक पोउपनि. सुभाष म्हैसाजी चोपडे यांनी १० हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान, लोकसेवक अर्थातच सपोउपनि. सुभाष चोपडे यांनी १० हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रूपयांची लाच खाजगी इसम शेख फारूक यांच्यामार्फत स्विकारली. लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड विभागाच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले व त्यांचे सहकारी पोलीस नाईक किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार, ईश्वर जाधव तसेच नरेंद्र बोडके यांच्या पथकाने उपरोक्त कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे.

COMMENTS