सेलू : दि.12जुन, मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूच्याविरूद्व लढणाऱ्या डाँक्टर,प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच रुग्णवाहिका चालकांच्याही अविरत सेवाकार्याची येथील मोरया प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेनेदखल घेतली. संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रुग्णवाहिका चालकांचा सन्मान करत आठवा वर्धापन दिन साजरा केला.
कोरोना काळात रुग्णांचा,कुटुंबातील सदस्यांचा थेट संपर्क असताना सुद्धा २४ तास फोनवर रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करणाऱ्या ,जात धर्म पक्ष न पाहता माणुसकीच्या नात्यातून रुग्णांना रुग्णालया असो घरापर्यंत सुखरूप ने-आण करण्याची जबाबदारी अखंडित पार पाडणाऱ्या शासकीय तथा खाजगी रुग्णवाहिकेचे चालक सन्मानापासून वंचित राहू नयेत यि हेतूनेच सेलू तालुक्यातील रुग्णवाहिका चालक सर्वश्री श्रीनिवास सोळंके,सचिन सावंगीकर,दीपक गिरी,सिद्धार्थ घागरमाळे, गणेश गात,चंद्रकांत बोराडे,बाळासाहेब काजळे,अनिल डोईफोडे आणि स्वर्गरथ चालक रवी अंभोरे यांचा सन्मान मोरया प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय हरबडे,देवगिरी नागरी सहकारी बँकेचे प्रबंधक भवर,नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक रामकिशन मखमले, नंदकुमार बंगाळे, विरेश कडगे ,तालुका क्रीडा संयोजक गणेश माळवे , शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे उपस्थित होते.
मोरया प्रतिष्ठान परिवार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, पर्यावरण, आध्यात्मिक यासह स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या सहकार्याने विविध क्षेत्रात मागील ८ वर्षांपासून लोकसहभागातून सामाजिक उपक्रम राबवत असून हे सेवाकार्य अविरत सुरू ठेवण्यासाठी मोरया प्रतिष्ठान परिवाराचे सहकारी तथा प्रतिष्ठानवर प्रेम करणारे मार्गदर्शक,हितचिंतक तथा स्नेहीजन यांच्या सहकार्याने कटिबद्ध असल्याचे मोरया प्रतिष्ठान परिवाराचे अध्यक्ष अभिजित राजूरकर यांनी प्रास्ताविक करताना नमूद केले.
मोरया प्रतिष्ठानने घेतलेल्या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक करत रुग्णवाहिका चालकांचे झाकोळलेले सेवाकार्य प्रकाशात आणल्याबद्दल समाधान व्यक्त केले. रुग्णवाहिका चालकांच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापत तसेच पावसाळा सुरू झाला असल्यामुळे भेटवस्तू म्हणून रेन कोटचे वाटप करण्यात आले.उपस्थितांना अल्पोपहार देत उपक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने सुजित मिटकरी यांनी आभार मानले.
उपक्रमासाठी मोरया प्रतिष्ठान परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.


COMMENTS