नांदेड.(प्रतिनिधी) विष्णूपुरी, नांदेड येथील श्री गुरू गोविंसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत अमेरिका आणि युरोपमध्ये असलेल्या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली 'फॉरेन स्टडी चाप्टर' अर्थातच परदेश अभ्यास कक्षाचे ३ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने उदघाटन करण्यात आले.
प्रत्येक विद्यार्थ्यांचे परदेशात उच्चशिक्षण घेण्याचे स्वप्न असते, पण आर्थिक अडचण किंवा योग्य त्या मार्गदर्शनाचा अभावामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षणाकरिता परदेशात जाण्याची संधी प्राप्त होत नाही. ही वास्तविकता लक्षात घेवून 'एसजीजीएस' अर्थात श्री गुरू गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी तसेच तंत्रशास्त्र संस्था विष्णूपुरी, नांदेड येथे 'परदेश अभ्यास कक्ष' या नावाने सुरू केलेला आहे. परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करून प्रस्तुत ग्रुपला शैक्षणिक प्रथम वर्षापासून परदेशातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण या चाप्टर माध्यमातून देण्यात येणार आहे. या अभ्यास कक्षाच्या ऑनलाईन उदघाटन सोहळ्यात अमेरिकाव युरोपस्थित संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. या अभ्यास कक्षाच्या उदघाटन सोहळ्याकरिता अखिलेश शिरभाते हे उच्च पदस्थ व संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले तसेच संस्थेच्या माजी विद्यार्थीनी सोनिया अहुजा यांनी प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
उपरोल्लेखित अभ्यास कक्ष चालविण्यासाठी एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार असून, प्रस्तुत सल्लागार मंडळात परदेशांमध्ये स्थायिक झालेले तसेच ज्यांच्या कार्याचाही ठसा जागतिक स्तरावर उमटविला असणारे माजी विद्यार्थीच राहणार आहेत. हे सल्लागार मंडळ विद्यार्थ्यांना बायोडेटा व अन्य विविध विषयावरही मार्गदर्शन करणार आहे. त्याचवेळी, इंटर्नशीपकरिता मार्गदर्शन व ते मिळवून देण्यासाठीही सहकार्य करणे आदी उपक्रमही राबविणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी, संस्थेचे संचालक प्रा. डॉ. वाय. व्ही. जोशी यांनी परदेशात उच्च शिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्याकरिता आपली संस्था नेहमीच प्रयत्नशील असते आणि भविष्यातसुद्धा प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही दिली. याशिवाय, नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून माजी विद्यार्थ्यांनी एखादा कोर्स सद्या शिकत असलेल्या विद्यार्थ्याकरिता घ्यावा, असे आवाहनही संचालक डॉ. जोशी यांनी याप्रसंगी केले. उपरोल्लेखित चाप्टर सुरू करण्याकरिता व आणि उदघाटन कार्यक्रमाची आखणी संस्थेतील विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. अरुणकुमार पाटील व विद्यार्थी समन्वयक अंगदसिंग सेना तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केली आहे.
COMMENTS