भारतातील प्रमुख बंदरातील कामगारांसाठी १ जानेवारी २०१७ पासून लागू होणारा वेतन करार ३० ऑगस्ट २०१८ रोजी केंद्रीय श्रम आयुक्तांच्या अधिपत्याखाली मुंबईत संपन्न झाला. या वेतन कराराची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपत असून १ जानेवारी २०२२ पासून नवीन वेतन कराराचा कालावधी सुरू होणार आहे. मात्र मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने अद्याप पूर्वीच्या कराराची संपूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. असे असताना देखील कोव्हीड जागतिक महामारीच्या या संकट काळात बंदर व गोदी कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून कमी कामगारांमध्ये काम करून मुंबई पोर्ट ट्रस्टला उत्पन्न मिळून देण्याचा उच्चांक गाठला.
वेतन करारातील अटीनुसार तीन महिन्यांच्या आत कामगारांना थकबाकी दिली पाहिजे, त्यानुसार इतर बंदरातील कामगारांना वेतन कराराची थकबाकी मिळाली. मात्र वेतन करारात कायदेशीर तरतूद असतांना देखील तीन वर्षे होत आले व वेतन कराराची मुदत संपण्यास आली, परंतु मुंबई बंदरातील कामगारांना मात्र अद्याप वेतन कराराची थकबाकी मिळाली नाही. त्याचप्रमाणे रजा विकणे, सणाची उचल, महागाई भत्ता व इतर भत्ते कराराप्रमाणे वाढीव दिले नाहीत. थकबाकी व इतर मागण्या मिळविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये, युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त केरशी पारेख या दोन्ही मान्यताप्राप्त कामगार संघटनेच्या नेत्यांनी सतत लेखी व प्रत्यक्ष भेटून मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाबरोबर पाठपुरावा करून देखील वेतन कराराची थकबाकी अद्याप मिळाली नाही. वाढलेला महागाई भत्ता देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही, त्यामुळे या अन्यायाविरुद्ध कामगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
सध्या जागतिक कोरोना महामारीचे संकट असतांना देखील वेतन कराराची थकबाकी व इतर मागण्या मिळविण्यासाठी बंदर व गोदी कामगार सुरक्षित अंतर ठेऊन व शासनाचे सर्व नियम पाळून १४ जून २०२१ ते १९ जून २०२१ या दरम्यान सर्व बंदर व गोदी कामगार काळ्या फिती लावून मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाच्या कामगार धोरणाविरुद्ध आपला निषेध व्यक्त करणार आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रशासनाने या निषेध सप्ताह आंदोलनाची दखल घेऊन कामगारांच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा बंदर व गोदी कामगारांना नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS