माजलगाव/प्रतिनिधी
शिक्षित मुले समाजाच्या उन्नती प्रित्यर्थ काही करणार आहेत का ? शिक्षण संपादन केल्यानंतर एखादी मोठी नोकरी मिळाली की बस्स ! झाले आपले काम ! मी कोण आहे ? मला शिक्षण कोणी दिले ? कसे दिले ? त्यांनी किती कष्ट केले ? याची तिळमात्र जाणिव न ठेवता हे लोक आपल्या समाजाला विसरतात त्यामुळे पददलित समाजाची सेवा करण्यासाठी आपल्यातील काही मुले उच्च शिक्षण घेवून तयार झालीच पाहिजेत.असे मत लढा मानवमुक्तीचे सचिन भैय्या उजगरे यांनी लोणगाव येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
प्रज्ञासूर्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या निमित्ताने लोणगाव, हिंगणी खुर्द,व हिगणी बुद्रुक या ठिकाणी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण लढा मानवमुक्तीचे अध्यक्ष सचिन भैय्या उजगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कोरोना महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील समाज बांधवांनी शासनाच्या नियमाचे पालन करुन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली.

COMMENTS